मांगीच्या सरपंच निर्मला बागल यांचे सरपंचपद रद्द..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आमदार संजयमामा शिंदे समर्थक ग्रामपंचायत सदस्य सुजीत बागल, कु.स्नेहल अवचर, शहाबाई नरसाळे, चतुराबाई शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे ॲड.कमलाकर वीर यांचेमार्फत सरपंच निर्मला बागल यांनी तब्बल दीड वर्षे ग्रामपंचायतीची सभा घेणे बाबत कसूर केलेने त्यांना सरपंच पदावरून अपात्र करणेबाबत अपील दाखल केले होते, त्यानुसार मांगीच्या सरपंच निर्मला दत्तात्रय बागल यांचे सरपंच पद जिल्हाधिकारी सोलापूर यांनी निरर्ह (अपात्र )घोषित करत रद्द केले आहे.
यामुळे माजी आमदार शामल बागल गटाला हा जबरदस्त धक्का मानला जात आहे . याबाबत सुनावणी दरम्यान ॲड वीर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी व योग्य न्यायनिवाडे सादर केले. दरम्यान आगामी मकाई, आदिनाथ, जि .प .पं.स निवडणुकीच्या तोंडावर बागल गटाला हा जबरदस्त धक्का मानला जात असल्याची चर्चा होत आहे.
दोन वर्षापूर्वी अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बागल गटाचे ५ तर शिंदे गटाचे ४ सदस्य विजयी झाले होते. या अपिलामधे अर्जदार ग्रामपंचायत सुजीत बागल व अन्य ३ यांचेवतीने ॲड. कमलाकर वीर व सरपंच निर्मला बागल यांचे वतीने ॲड.नानासाहेब शिंदे यांनी काम पाहीले. या निर्णयानंतर आ.शिंदे समर्थकांनी जल्लोष केला.