“मांजरगावकरांचं निस्वार्थ दान — गाजावाजाशिवाय पूरग्रस्तांना   दिवाळीसाठी दिली रोख मदत”

0
सदरचा फोटो मांजरगावकरांनी काढलेला नसून, ज्यांना मदत मिळाली त्यांच्या जवळच्या व्यक्तीने काढला असून, त्यांनीच फोटो व माहिती दिली आहे.

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२२:आजच्या काळात फोटोसेशनशिवाय कोणताही उपक्रम होत नाही, फोटो नसेल तर पुन्हा पुन्हा फोटो काढले जातात. अशा काळात मांजरगावसारख्या  छोट्याशा गावाने  दानाचं महत्व पटवून देताना कोणताही गाजावाजा न करता २३ पूरग्रस्त कुटुंबीयांच्या घरी जावून दिवाळीसाठी ६३ हजार रुपयाची रोख मदत दिली आहे.

अलीकडील पुरामुळे अनेक कुटुंबांची दिवाळी अंधारात असताना,   मांजरगावच्या ग्रामस्थांनी कोणत्याही घोषणेशिवाय, नेत्यांच्या उपस्थितीशिवाय आणि माध्यमांच्या कॅमेऱ्याशिवाय उत्स्फूर्तपणे येऊन ₹६३,००० इतकी रक्कम जमा केली. ही रक्कम त्यांनी स्वतः जाऊन गरजूंना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवली. ना बॅनर, ना फोटो, ना भाषण — फक्त एकच उद्दिष्ट, “  आपल्या माणसांच्या अंधारातील दिवाळीत प्रकाश यावा.”

पुरग्रस्त भागातील २३ कुटुंबांपर्यंत गावकऱ्यांनी स्वतः जावून  रोख स्वरूपात मदत दिली. विशेष म्हणजे  ना मदत देणाऱ्यांची नावे, ना ज्यांना मदत दिली त्यांची नावे. दान हे जाहिरातीसाठी नसतं, तर आपल्या माणसाच्या गरजेसाठी द्यायचं असतं, हा संदेश त्यांनी या आचरणातून दिला.

गावकऱ्यांच्या या नि:स्वार्थ उपक्रमाला सर्वत्र दाद मिळत असून, मांजरगाव हे ‘माणुसकीचं गाव’ म्हणून ओळखलं जावू लागले आहे. या आगळ्या-वेगळया दातृत्वाची चर्चा आता संपूर्ण परिसरात होत आहे. ज्यांनी काहीही प्रसिद्धी नको म्हणून मागे राहण्याचा निर्णय घेतला, त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक शब्दात मावणं कठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!