मुंबईत करमाळा तालुक्यातील अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

करमाळा (दि. ८ जुलै) : राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना करमाळा तालुक्यात देखील असाच बदल होऊन अनेक प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात दिनांक ७ जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल आणि जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला.

या प्रसंगी करमाळा तालुक्यातील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, नागरिक संघटनेचे नेते व अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा संघटक हरिभाऊ मंगवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील, सौ. माया झोळ, श्रीकांत साखरे, सुभाष शिंदे, प्रीतम सुरवसे, गोरख जाधव, मोहन भणगे, शरद भोसले, हरिभाऊ झिंजाडे, दत्तात्रय जगदाळे, रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, श्री. तळेकर यांचाही पक्षप्रवेश झाला. भाजपमध्ये प्रवेश केला.


या प्रवेशानंतर नेत्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “करमाळा तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे काम घराघरात पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत भाजपचे कमळ फुलवण्यासाठी आम्ही एकदिलाने काम करणार आहोत. यामुळे करमाळा तालुक्यात भाजपची ताकद निश्चितच वाढणार आहे.”


या सामूहिक प्रवेशामुळे करमाळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून गटतटांच्या पलीकडे जाऊन तालुक्यात पक्षीय राजकारणाकडे वाटचाल सुरू झाल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.





