मराठी भाषा मनामनात रूजली पाहिजे : प्रा.प्रदीप मोहिते..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : मराठी भाषा ही मनामनात रूजली पाहिजे व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत,असे मत येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.प्रदीप मोहिते यांनी व्यक्त केले.
येथील न्यायालयात तालुका विधी समिती व करमाळा वकील संघाच्यावतीने काल (ता.24) ‘बालिकादिन’ तसेच ‘मराठी भाषा पंधरवडा’ या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रा.मोहिते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरीष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीश सौ.मीना एखे या होत्या. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश आर.ए.शिवरात्री, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दत्तात्रय सोनवणे, उपाध्यक्ष ॲड. जयदीप देवकर, तसेच ॲड. कमलाकर वीर, ॲड. एल.एच.पाटील, ॲड.सविता शिंदे, मुख्याध्यापक गभाले आदीजण उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.मोहिते म्हणाले की, बोलताना आपण सहज चुकीचे शब्द वापरतो, त्यामुळे भाषेचे सौंदर्य बिघडते.आमची बायको, आमचे मिस्टर असे सहज शब्द वापरतो ते चुकीचे असतात. मराठी भाषा आत्मविश्वासाने बोलली पाहिजे व जतन केली पाहिजे.
यावेळी ॲड.अक्षय वीर यांनी बाल लैंगिक अत्याचार विषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले तसेच बालिका दिनावर बोलताना त्यांनी सांगितले की, लहान बालिकांना मुक्त पणे जिवन जगता आले पाहिजे.
समाजाने बालिकाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे.
यावेळी न्यायाधीश सौ.एखे ॲड.डॉ.बाबूराव हिरडे तसेच मुख्याध्यापक श्री.गभाले यांची भाषणे झाली. याप्रसंगी करमाळा न्यायालयातील सर्व वकील तसेच न्यायालयीन अधीक्षक, कर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरिष्ठ न्यायालयातील अधिक्षक डि.व्हि.कांबळे यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी वरिष्ठ न्यायालयातील एन.जी.घाडगे, गणेश सावंत आदी जणांनी परिश्रम घेतले.