उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार जगताप यांची भेट - जगताप यांनी 'राष्ट्रवादी'ची उमेदवारी नाकारली - पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार… -

उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार जगताप यांची भेट – जगताप यांनी ‘राष्ट्रवादी’ची उमेदवारी नाकारली – पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार…

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : माजी आमदार जयवंतराव जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा विधानसभेसाठी उमेदवारीसाठी विचारणा केली होती, परंतु मा.आमदार श्री.जगताप यांनी ती उमेदवारी नाकारली असून, करमाळा तालुक्यातील राजकारणात आपली पुढील भूमिका ते लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

अजितदादा पवार समर्थक अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी पक्षाचे उमेदवारी घेणार नसल्याचे सांगितल्यानंतर पवार यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मुंबई येथे भेटीसाठी बोलावले होते, यावेळी श्री.पवार यांनी श्री.जगताप यांना करमाळा विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविणे विषयी विचारणा केली होती, तसेच लाडकी बहीण योजना कार्यक्रमाच्या माध्यमातून करमाळा येथे तुमच्या उमेदवारीचे सूतोवाच व राजकीय समर्थन जाहीर करतो व तुमच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अंबालिका कारखान्याची यंत्रणा तुमच्या पाठीशी उभा करतो तुम्ही उमेदवारी स्वीकारा बाकी सर्व मी पाहत, असे अजितदादा पवार यांनी जगताप यांना भेटीवेळी सांगितले होते.

परंतु श्री.जगताप यांनी सध्याच्या केंद्र व राज्य शासनाबद्दल जनतेच्या मनात तीव्र रोष व नाराजी असून, जनतेच्या विचारांशी मी प्रतारणा करू शकत नाही असे स्पष्टपणाने सांगितले. तसेच लाडकी बहीण योजनेचे अनुदान ,अंबालिकाचा दर या बाबी जनतेच्याच खिशातून जीएसटी सारख्या व अन्य कराच्या माध्यमातून स्वतःच्याच पैशातून स्वतःला मिळत असल्याची जनतेची भावना आहे असे श्री.जगताप यांनी अजितदादा पवार यांना सांगितले.

आपण ताकद दिलेले आपले समर्थक अपक्ष आमदार देखील आपली उमेदवारी नाकारत आहेत यावरून आपण राजकीय रसद पुरवून देखील तेआपल्याशी एकनिष्ठेने राहिले का ? याचा गांभीर्याने विचार करावा, असे जगताप यांनी श्री.पवार यांना सांगत राष्ट्रवादी काँग्रेसची पर्यायाने महायुतीची उमेदवारी नाकारली आहे. त्यानंतर अजितदादा पवार यांनी करमाळा दौरा केला होता, यावेळी होणाऱ्या विविध कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर व कोनशिले वर माजी आमदार जगताप यांचा नामोल्लेख असताना देखील जगताप यांनी या दौऱ्यात जाण्याचे टाळले होते. त्यानंतर जगताप यांनी सोलापूर येथे माजी केंद्रीयमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची देखील भेट घेतली होती. गेल्या वर्षी करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोहिते पाटील यांच्या पुढाकारामुळे बिनविरोध झाली होती. तेव्हापासून जगताप यांची मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांचेशी जवळीक वाढल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत जगताप गटाने बाजार समिती निवडणूकीत केलेल्या सहकार्याची परतफेड म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला होता. गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता,आमदार शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास जगताप यांची अनुपस्थितीआदी बाबींचा विचार करता जगताप हे शिंदेंपासून दुरावलेत का ? अशी ही चर्चा आहे. २०१९ साली झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत माजी आमदार जगताप यांच्या पाठिंब्यामुळेच आमदार संजयमामा शिंदे हे विजयी होऊ शकले हे निर्विवाद सत्य आहे. आता जगताप यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून जगताप गटाच्या भूमिकेवरच विधानसभा निवडणुकीच्या निर्णयाचे भवितव्य अवलंबून आहे. जगताप स्वतः निवडणूक लढणार का ? आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा देणार की नारायण पाटील यांना समर्थनाची भूमिका घेणार ? या सर्व बाबी सध्यातरी अनुत्तरीत आहेत. त्यामुळे जयवंतराव जगताप यांच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याविषयी जयवंतराव जगताप यांनी तालुक्याच्या विकासासाठी व कार्यकर्त्यांच्या हितासाठी योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!