राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत केमची मानसी चव्हाण द्वितीय; केम येथे सन्मान संपन्न -

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत केमची मानसी चव्हाण द्वितीय; केम येथे सन्मान संपन्न

0

केम(संजय जाधव): स्मार्टअस अबॅकस क्लासेस, केम यांच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केम येथील राम मंदिर येथे पार पडला. २५ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत देशभरातून सुमारे १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत स्मार्टअस अबॅकस क्लासेस, केम येथील एकूण १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये केम येथील मानसी चव्हाण हिने ग्रेड ‘ए’ मध्ये देशात द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी राम मंदिर येथे आयोजित सत्कार समारंभात मानसी चव्हाणसह लेव्हल १ व लेव्हल २ मधील यशस्वी तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तकला शिक्षण संस्था यांच्या सचिव माया झोळ होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर, प्रवचनकार व कीर्तनकार जयंत करंदीकर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षीय भाषणात माया झोळ यांनी आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली असून आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही यश मिळवता येते, असे प्रतिपादन केले. तर जयंत करंदीकर यांनी अभ्यास हेच आपले खरे काम असून त्यात सातत्य ठेवले तर प्रगती निश्चित होते, असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन स्मार्टअस अबॅकस क्लासेस, केम यांच्या संचालिका सोनल गौरव कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला. या यशाबद्दल केम परिसरातून संस्थेचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!