करमाळा(दि.३०): मांगी येथील रहिवासी व पत्रकार,गायक प्रवीण अवचर यांनी केलेल्या सतर्कतेच्या एका मेसेजमुळे मांगी गावात धाडसी चोरीचा प्रयत्न फसला आहे. चोर आल्यानंतर गावकऱ्यांना सतर्क करण्यासाठी लाऊडस्पीकरवर घोषणा द्यावी अशा आशयाचा मेसेज त्यांनी गावातील वेगवेगळ्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये केला होता.
याबाबत हकीकत अशी की मांगी येथे २६ जानेवारीला मध्यरात्री मांगी येथील बलभीम बागल यांच्या घरी चोरी झाली होती. चोरांनी इतर घरांना बाहेरून कड्या लावून चोरी केली होती. तसेच इतर २-३ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला होता. मांगी गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा सध्या बंद असल्यामुळे गावातील लोक सतर्क राहू शकले नाहीत आणि चोरी विषयी माहिती गावकऱ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी समजली. ही बाब मांगी येथील रहिवासी व पत्रकार प्रवीण अवचर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेला पर्याय म्हणून त्यांनी चोरांच्या बाबतीत काही संशयास्पद आढळून आले तर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या लाऊड स्पीकरवरती अनाउन्स करावे असा मेसेज सगळीकडे मोबाईलवर पाठविला.
नेमके त्याच रात्री मांगी येथील घुमटवस्ती वरती पहाटे १ ते दीड च्या सुमारास श्री सोपान बारवकर यांच्या घराजवळ चोर आल्याचे समजताच तात्काळ बारवकर यांनी मोबाईल वरून पोलीस पाटील आकाश शिंदे यांना संपर्क केला. त्यांनी ताबडतोब मांगी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या लाऊड स्पीकर वरून चोर आले असल्याचे अनाउन्स करून गावालातील लोकांना सतर्क केले. गावातले लोक जागे झाल्याने चोरी करण्याच्या उद्देशाने गावात घुसलेले चोर तेथून पसार झाले व चोरीची मोठी घटना टळली.
ग्रामपंचायतीने आपली ग्राम सुरक्षा यंत्रणा कायम तैनात ठेवावी. तसेच ज्या गावांमधील ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यरत नाही, अशा गावांमधील लोकांनी मंदिरांवरती लावलेला लाऊडस्पीकरवरती अनाउन्स करून गावातील वाड्या वस्तीवरील लोकांना सतर्क करण्यासाठी वापर करावा.
प्रवीण अवचर, पत्रकार, मांगी (ता.करमाळा)
काय आहे ग्रामसुरक्षा यंत्रणा?
गावात चोरी झाली, लहान मुले हरवली, वाहन चोरीला गेले, अपघात झाला, वन्यप्राण्यांनी हल्ला केला, पुर आला, ग्रामसभा अशा कोणत्याही आपत्तीच्या वेळी केवळ (18002703600) या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली असता परिसरातील सगळे लोक एकावेळी मदतीला येऊ शकतात. आपत्ती तसेच दुर्घटनेच्यावेळी जवळच्या व्यक्तींना तातडीने संदेश मिळावा, यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेने देण्यात आलेल्या टोल फ्री नंबरवर फोन केल्यास त्याचा आवाज फोनद्वारे परिसरातील यंत्रणेला नोंदणी केलेल्या हजारो नागरिकांना त्वरित मोबाइलवर ऐकू जातो. नागरिकांना घटना घडत असतानाच तिची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे सहज शक्य होते.