खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन सामाजिक चळवळीला बळ द्यावे - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर - Saptahik Sandesh

खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन सामाजिक चळवळीला बळ द्यावे – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला- मुलींची लग्न लावून देऊन श्रीराम प्रतिष्ठान सारख्या सामाजिक चळवळीला बळ द्यावे असे प्रतिपादन सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी करमाळा येथे श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात व्यक्त केले.

श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा येथे शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता गोरज मुहूर्तावर श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये २१ जोडपी विवाह बंधनात अडकली. यातील २० जोडप्यांचे हिंदू विवाह पद्धतीने तर एका जोडप्याचे बौध्द धर्मीय पध्दतीने विवाह पार पडला.

या विवाह सोहळ्यातील वर राजाची शहरातील घोड्यावरील मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, या विवाह सोहळ्यातील वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी वधू-वर यांना शुभाशीर्वाद दिले व श्रीराम प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच अशा प्रकारच्या सामाजिक कार्याला आमचे सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे सर, अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी, स्वराज साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीतदादा निंबाळकर, तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच -उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन तसेच सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ,

हा सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी मानले.

On behalf of Shri Ram Pratishthan, an interfaith community marriage ceremony was conducted at Karmala on Saturday 11th February at 6:30 pm on Goraj Muhurta under the guidance of Ganesh Chiwte, Founder President of Shri Ram Pratishthan. In this, 21 couples got married. Out of these, 20 couples got married in the Hindu way and one couple got married in the Buddhist way.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!