कोर्टीत कापड व्यापाऱ्याच्या दुकानातून लाखोंचा माल लंपास

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.26 : कोर्टी येथे कपड्यांच्या दुकानात चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकत लाखोंचा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे. सोमनाथ शंकर गिरमे यांनी याबाबत करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गिरमे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की कोर्टी गावात माझे “गिरमे कलेक्शन” नावाचे कपड्यांचे दुकान असून ते रोजप्रमाणे 20 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेला सेफ्टी डोअर उघडा व आत प्लास्टिकचा दरवाजा तुटलेला दिसला. दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.दुकानातून जिन्स पॅन्ट, लेडीज ड्रेस, अंडरवेअर, बॉक्स, साईजच्या कपड्यांसह सुमारे 60 ते 65 हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. दरम्यान, त्याच भागातील हनुमंत रामदास मेढे यांच्या ‘मोरया मोटर रिवायंडिंग’ या दुकानातही चोरी झाल्याचे समजले आहे.
याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





