अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेतून करमाळा तालुक्यासाठी 4 कोटी 16 लाख निधी मंजूर – आमदार संजयमामा शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी सन 2023 – 24 मध्ये अहिल्यादेवी सिंचन विहीर योजने अंतर्गत विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या 600 प्रस्तावापैकी 104 विहिरींचे प्रस्ताव मंजूर झाले असून, त्यासाठी 4 कोटी 16 लाख रुपये अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रत्येक विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान शासनाने मंजूर केले असून या निधीमधून विहिरीचे पूर्ण काम होत आहे. त्यामुळे भविष्यकाळात प्रत्येक गावातील शेतकऱ्याला याचा फायदा होईल.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा – श्री मनोज राऊत, गटविकास अधिकारी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीसाठी अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते . विहिरींसाठी पूर्वी 3 लाख अनुदान दिले जात होते .त्यामध्ये वाढ करून यावर्षी पासून 4 लाख अनुदान मंजूर करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे कमीत कमी 1 एकर व जास्तीत जास्त 5 एकर जमीन असणे अपेक्षित आहे. 2 विहिरींच्या दरम्यान किमान 500 फूट अंतर असावे अशी यापूर्वी अट होती ही अट आता रद्द करण्यात आलेली आहे. सदर विहीर रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर होत असल्या कारणामुळे मुजरांकडून काम होणे अपेक्षित आहे. यासाठी ब्लास्टिंग व क्रेनचा वापर करण्यास परवानगी आहे . मोठ्या मशीन चा वापर यासाठी करण्यात येऊ नये.