सीना-कोळगाव प्रकल्पाचे उन्हाळी आवर्तन सुरु – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले सीना कोळगाव धरण यावर्षी ओहर फ्लो झाले होते, त्यामुळे या धरणाचे पाणी उन्हाळी आवर्तनामध्ये कोळगाव उपसा सिंचन योजनेद्वारे करमाळा तालुक्यासाठी 1 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजता सुरू झाले असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
हे उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचा फायदा या कोळगाव गौंडरे आदी गावांना होणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका अंतर्गत येणाऱ्या सीना कोळगाव प्रकल्पाची सन 2022 – 23 ची उन्हाळी हंगाम नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक आज दि.28 फेब्रुवारी रोजी उस्मानाबादचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री ना.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली होती. या बैठकीमध्ये उन्हाळ्यात करमाळा तालुक्याला 2 आवर्तने देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
सीना कोळगाव प्रकल्पाचा पाणी सोडण्याचा कार्यक्रम काल कोळगाव प्रकल्प पंप गृह येथे झाला याप्रसंगी गौंडरे गावचे सरपंच सुभाष हनपुडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव दौंडे, माजी सरपंच दिनकर सांगडे, भाऊ हनपुडे, ज्योतीराम कापले, ग्रामपंचायत सदस्य कालिदास रणमुडे, उमराव रणमुडे, सदाशिव कोपनर तसेच सीना कोळगाव प्रकल्पाचे शाखा अभियंता कांबळे, चौगुले साहेब आदी उपस्थित होते.