करमाळा तालुका 100% बागायत होण्यासाठी कुकडी-उजनी योजना राबविणार : आमदार संजयमामा शिंदे
करमाळा / संदेश : विशेष प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुका शंभर टक्के बागायत होण्यासाठी उजनी-कुकडी योजना आपण राबविणार असून त्यासाठी पाटबंधारे विभागाने हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
आ.शिंदे यांच्या ३१ जुलै रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त सा.संदेशशी ते बोलत होते. पुढे बोलताना आ.शिंदे म्हणाले की, उजनी-कुकडी या योजनेत कुकडीचे पाणी करमाळा तालुक्याला मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिलेला आहे. या प्रस्तावास शासनाने अनुकूलता दाखवली असून उजनी- कुकडी या योजनेत कुकडीचे पाणी करमाळा तालुक्यासाठी २५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी मंजुर आहे. हे पाणी कॅनॉलद्वारे न देता उजनीत सोडून उजनीतून ते पाणी वाशिंबे येथून उचलून पोंधवडी चारीत (बोगदा) सोडून तेथून ते पाणी कुकडी जुन्या कालव्याद्वारे मांगी तलावात तसेच जातेगाव पर्यंत दिले जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात केत्तूर येथून उजनीचे पाणी उचलून चारी क्र. १९४ (किमी) येथे कुकडी चारीत पाणी सोडायचे आहे. तेथून कालव्याद्वारे ते पाणी तालुक्यातील शेतीला दिले जाणार आहे. याबाबतचा सर्व्हे पाटबंधारे विभागाने केला असून तसा अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानुसार ही योजना सुप्रमो मध्ये घेण्याचे ठरले आहे. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वीत करून तालुक्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्राचा पाण्याचा प्रश्न कायम सुटणार आहे. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण कामासाठी ११६ कोटी रूपयाचा प्रस्ताव दिलेला त्याची वर्क ऑर्डरही निघालेली आहे.
२५.१५ योजना : ५० कोटी निधी…. ग्रामीण रस्तेसाठी : २५ कोटी • थेट अनुदान : १० कोटी समाजकल्याणसाठी : ५ कोटी रू. असा निधी मंजूर झाला आहे. गेल्या नऊ महिन्यात एक रूपयाचेही अनुदान मिळालेले नाही. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर तातडीने अनुदान मिळाले असून विविध विकासकामांना मान्यता मिळाली असून गती मिळाली आहे. …आ.संजयमामा शिंदे
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच पहिल्याच भेटीत करमाळा तालुक्यासाठी अभी अनुदान दिले आहे. योजनेसाठी ११६ कोटीच्या प्रस्तावास मंजुरी मिळालेली असून वर्क ऑर्डर निघाली आहे. जातेगाव-टेंभूर्णी या हायवे रस्त्यासाठी मान्यता मिळाली आहे. नगर ते जातेगाव पर्यंत रस्ता झाला आहे. तेथून जातेगाव ते टेंभूर्णी पर्यंत २८ मीटरच्या रस्ता डांबरीकरणासाठी मंजुरी मिळालेली आहे. साईडपट्टया व सर्व्हिस रोड वगळता हा रास्ता होणार आहे. या रस्त्याचे लवकरच टेंडर निघणार आहे…
त्यामुळे दहिगाव योजनेचे सर्व प्रश्न सुटणार आहेत. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडू नये म्हणून दोन टप्प्यासाठी दोन जादा विद्युतपंप बसविण्यात येणार आहेत. यामुळे पाणी खाली गेले तरी दहिगाव योजनेसाठी पाणी कमी पडणार नाही. तसेच सर्व उपचारीची कामे करण्यात येणार असून दहिगाव योजना अद्ययावत करून ती चांगल्या पध्दतीने चालविण्यात येणार आहे.
करमाळा तालुक्यातील एमआयडीसी साठी सांगली येथे कार्यालय आहे. उद्योजकांची गैरसोय होवू नये म्हणून या कार्यालयाचे टेंभूर्णी व करमाळा एमआयडीसी साठी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी केली आहे. उजनी-कुकडी योजनेचे पाणी मांगी तलावात येणार असल्याने मांगी तलावातून एमआयडीसी साठी पाणी आणले जाईल. तसेच एमआयडीसीमधील प्लॉटच्या किंमती जादा आहेत. त्या कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या किंमती कमी झाल्यावर लवकरच करमाळा एमआयडीसी मध्ये उद्योग उभे राहतील. याशिवाय वीज, पाणी, रस्ते आदी सुविधा देण्यावरही लक्ष राहणार असून इतर वेगवेगळ्या योजना राबविण्यसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.