स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात - मोहन जोशी -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात – मोहन जोशी

0

करमाळा(दि.२२) : ईव्हीएम मशिनमधून निवडणुकांमध्ये घोटाळे होत असल्याचा आरोप करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय)चे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी करमाळा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही मागणी केली.

बैठकीपूर्वी शहरातील पंजाब वस्ताद चौकातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोहन जोशी यांच्या स्वागतासाठी मिरवणूक काढली. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. करमाळा तालुकाध्यक्ष प्रताप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

या बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप जगताप, राहुल जगताप, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष गफूर शेख, जावेद शेख, किसान मोर्चा अध्यक्ष दादासाहेब कुदळे, संभाजी शिंदे, शहराध्यक्ष सुजय जगताप, अशोक घरबुडे, देवराव सुकळे, निकेश चव्हाण, भगवान डोंबाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोहन जोशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, काँग्रेस (आय) पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागावे. स्थानिक पातळीवर योग्य पक्ष व गटांशी युती केल्यास प्रदेश काँग्रेसतर्फे त्यास मान्यता दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी लवकरच नाव जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही जोशी यांनी दिली. करमाळा तालुकाध्यक्ष प्रताप जगताप हे जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असून सर्व इच्छुकांशी चर्चा करून एकमताने नव्या जिल्हाध्यक्षाची निवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रताप जगताप यांनी मोहन जोशी यांचे स्वागत करत, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. जोशी यांनी जगताप यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत, पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत दिले.

शेवटी जोशी यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आगामी निवडणुका मोठ्या ताकदीने लढविण्यात येतील आणि प्रताप जगताप यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *