किरकोळ कारणावरून मोटारसायकल पेटवली

करमाळा (ता. ११) : रस्त्यात मोटारसायकल का आडवी लावली, असे म्हणून तुझी मोटारसायकल जाळूनच टाकतो.. अशी धमकी देऊन प्रत्यक्षात आज (ता. ११) पहाटे पावणेतीन वाजता मोटारसायकल पेटवून देऊन ४५ हजाराचे नुकसान झाले आहे. हा प्रकार दिलमेश्वर (ता.करमाळा) येथे घडला आहे.
या प्रकरणी महादेव देवराव मस्के (रा. दिलमेश्वर ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या दैनंदिन कामासाठी होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटारसायकल एमएच ४५ एटी ४२९९ ही खरेदी केली आहे. सदरची मोटारसायकल रस्त्यावर लावली असता गावातील सोमनाथ भिका मारकड यांनी तु मोटारसायकल रस्त्याला का लावतोस, तुझी मोटारसायकलच पेटवून देईन.. अशी धमकी दिली. १० फेब्रुवारीला रात्री दहा वाजता माझ्या घरासमोर ही मोटारसायकल लावली होती. ११ फेब्रुवारीला पहाटे पावणेतीन वाजता आवाज आला म्हणून मी घराच्या बाहेर येऊन पाहिले असता, मोटारसायकल पेटलेली दिसली व तिथेच सोमनाथ मारकड हा उभा होता. मी त्याला आवाज दिला, त्यावेळी तो पळून गेला. त्यानंतर आम्ही मोटारसायकल विझवली. परंतु ४५ हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






