करमाळा शहरातील अनेक भागांत दूषित पाणीपुरवठा – नागरिकांच्या तक्रारीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष

करमाळा (दि.२२) – करमाळा शहरातील अनेक भागांत दूषित पाणीपुरवठा होत असून यावर नागरिकांनी वारंवार तक्रारी करुन देखील नगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. शहरातील सहनशील जनता पाणी पुरवठ्याविषयीच्या समस्या किती दिवस सहन करत राहणार हा प्रश्न समोर आला आहे.
दुष्काळात, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते त्यावेळी जनता पाण्याच्या बाबतीत काटकसरीने वापर करत जमवून घेते. यंदा उजनीने शंभरी पार केली असून देखील केवळ नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना सतत वेगवेगळ्या कारणाने पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. कधी मोटर जळाली, कधी पाईपलाईन फुटली, या ना त्या कारणाने सुरळीत पाणी पुरवठा जनतेला मिळत नाही.
नागरिकांना होणारा पाणीपुरवठा अपुऱ्या दाबाने व कमी कालावधीसाठी होत असल्याने मिळेल तेवढ्या पाण्यात नागरिकांना समाधान मानावे लागते. त्याचबरोबर पाईपलाईन मध्ये असलेल्या बिघाडामुळे शहरातील बऱ्याच ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेतली जात नसल्यामुळे शहरवासिय हतबल झाले आहेत.
एक-दोन दिवसांआड पाणी येत असल्यामुळे नागरिक इतर कामे सोडून नळाला पाणी येण्याची वाट पाहत असतात. पाणी सुटण्याची वेळ सकाळी साडेसात ची असली तरी किमान पाच मिनिटे नगरपालिकेच्या नळ संयोजनातून केवळ हवा येते. त्यानंतर दहा मिनिटांपर्यंत बुडबुडे येत पाणी यायला सुरुवात होते. पंधरा मिनिटे अशीच गेल्यानंतर कुठूनतरी पाणी व्यवस्थित येत आहे असे वाटताच हे पाणी गाळयुक्त, फेसाळ आणि काळे येत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे परत दहा मिनिटे हे पाणी तसेच सोडून द्यावे लागते. होणारा पाणीपुरवठा हा अपुऱ्या दाबाने असल्याने मोटारी लावल्याशिवाय पाणी भरणे अशक्य असते. मात्र स्वच्छ पाणी यायला सुरुवात झाल्याने मोटर लावेपर्यंत तर महावितरणच्या दैनंदिन लोड शेडिंग नुसार विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाणी वाहून भरावे लागते. साडेआठला लाईट आल्यानंतर केवळ दहा ते पंधरा मिनिटेच पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि परत येणाऱ्या पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागते.

गेल्या दोन वर्षांपासून याच परिस्थितीतून करमाळा शहरवासीय जात असून वारंवार तक्रारी करूनही यात कोणतीही सुधारणा होत नसल्याने शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अजून किती दिवस पुरेशा दाबाने आणि पुरेशा वेळेत शुद्ध पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा ही अत्यावश्यक बाब आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील अनेक भागात गाळ युक्त, अपुऱ्या दाबाने, फेसाळ आणि काळे पाणी येत आहे. नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही नगरपालिकेकडून ठोस उपाययोजना केली जात नाही. नगरपालिकेने लवकरात लवकर पाणीपुरवठ्यात सुधारणा केली नाही तर पाण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुतार गल्ली आणि दत्तपेठ येथील नागरिकांनी दिला आहे.
ठिकठिकाणी बांधकामे चालू असल्याने बऱ्याच ठिकाणी खडी वाळू साचल्याने गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे कुठून तरी अशुद्ध पाणी पाईपलाईन मध्ये जात आहे. पाणीपुरवठा विभागाकडून हे लिकेज शोधण्याचे काम चालू असून लवकरच शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल.
● कमलेश भोज, कर्मचारी, पाणीपुरवठा विभाग, नगरपरिषद करमाळा.





