देवीचामाळ रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई; विक्रेत्यांना स्थलांतराचे नगरपरिषदेकडून आदेश

करमाळा (दि.२५): दौंड-करमाळा-परांडा-बार्शी-उस्मानाबाद या राज्य मार्ग क्रमांक ६८ वरील देवीचामाळ रोड परिसरात, भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांनी तात्पुरते शेड उभारून अतिक्रमण केल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास अडथळा निर्माण झाला असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाने या विक्रेत्यांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावल्या. संबंधित विक्रेत्यांची यादीसह अहवाल २१ एप्रिल रोजी करमाळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.

मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी त्वरित हालचाल करत, अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांना चुनखडी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या भाजी मंडईत स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. “नवीन मंडईमध्ये विक्रेत्यांसाठी ओटे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवून प्रशासनाने कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता. अतिक्रमणामुळे या रस्त्यालगत असलेल्या 30 ते 40 अधिकृत मालमत्ता धारक व्यवसायिकांची दुकाने बंद पडत असून त्यांच्या दुकानात जायला सुद्धा रस्ता राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. याची दखल घेत प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेल्या नोटीसीनंतर सर्व भाजी विक्रेत्यांनी मिळून सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला व सदर ठिकाणी भाजी विक्रीची परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे.

काही राजकीय पुढारी फक्त मतांसाठी खोटी सहानुभूती या बेकायदेशीर विक्रेत्यांना दाखवून संपूर्ण शहरवासीयांच्या व देवी भक्तांच्या जिवाशी खेळ करत आहेत.
● महेश चिवटे



