पोंधवडी येथे पत्नीचा सुपारी देवून खून – पतीसह मारेकऱ्यांना मुद्देमालासह अटक पोलीसांची विशेष कामगिरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोंधवडी येथे सुपारी देऊन पत्नीचा खून करणाऱ्या पतीसह खुन प्रकरणातील अन्य पाच जणांना पोलीसांनी अटक केली असून त्यांना २५ जुलैला न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायाधीश एस.पी.कुलकर्णी यांनी सहा दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
यात हकीकत अशी की, पोंधवडी येथील बिभिषण उर्फ पिन्या विलास मत्रे (वय २६) याचा विवाह सौ.कोमल (वय-२३) हिच्याबरोबर ११ जुलै २०१७ ला झाला होता. त्यानंतर ते तीन वर्षे सासरी नांदली. सासरी वाद निर्माण झाल्याने ती माहेरी आली होती. त्यानंतर ती नांदायला गेली नाही. त्यानंतर १४ जुलै २०२३ ला बिभिषण मत्रे, त्याचा भाऊ देवीदास मत्रे, आई पुष्पाबाई मत्रे व भावजयी सोनाली मत्रे यांनी सौ.कोमल तसेच वडिल सौदागर वाघ यांना तुम्ही हीस नांदावयास का पाठवत नाही म्हणून मारहाण करून गंभीर जखमी केले होते.
त्याचा गुन्हा दाखल असून कोर्टात सदरचा खटला चालू आहे. असे असताना २३ जून २०२४ रोजी बिभिषण मत्रे याने सौ. कोमल हिला धमकी दिली होती. त्यावेळी दोघांनी एकमेकाविरूध्द अदखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत. तसेच कोमल हिने बिभिषण मत्रे याच्या विरूध्द कौटुंबिक हिंसारापासून महिलांचे संरक्षण या अधिनियमानूसार करमाळा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्याचा राग मनात धरून यातील बिभिषण मत्रे याने तिच्या खुनाची सुपारी देऊन १६ जुलैला रात्री अडीच वाजता सौ. कोमल हिच्या माहेरी जाऊन तिचा कोयत्याने वार करून खुन केला आहे.
या प्रकरणी १७ जुलैला सकाळी सातच्या सुमारास अलकाबाई सौदागर वाघ (रा. पोंधवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनूसार गुन्ह्याचा शोध करण्यासाठी पोलीसांनी घटनास्थळी फॉरेंसिक पथकाचे अधिकारी, ठसे तज्ञ व श्वान पथक पाचारण केले होते. यावेळी गुन्ह्यात वापरलेल्या हत्याचा वास, डॉग स्कॉड मधील डॉगला दिल्यानंतर तो डॉग बिभिषण मत्रे याच्या घरासमोर जाऊन जोरात भुंकू लागला. त्यानुसार बिभिषण उर्फ पिन्या विलास मत्रे यास ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली. त्यावेळी घटनास्थळाच्या जवळच अन्य हत्यारे सापडली. बिभिषण मत्रेला अटक केल्यानंतर चौकशी केली असता यामध्ये रोहन प्रदीप मोरे (रा. जलालपूर, ता. कर्जत, जि.अ.नगर) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्याला या तपासकामी अटक केली. त्यावेळी बिभिषण मत्रे याने रोहन मोरे याचे मार्फत सुनील उर्फ काका विष्णू शिंदे, प्रदीप उर्फ दिपक सुनिल हरिभक्त (दोघे रा.भांबोरा, ता.कर्जत,जि.अ.नगर) यांना साडेआठ लाख रूपयाची सुपारी देऊन कोमल हिचा खुन करण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सुनील शिंदे व प्रदीप हिरभक्त यांना अटक करून तपास केला असता त्यामध्ये विशाल उर्फ सोन्या परशुराम सवाणे ( रा.जाचक वस्ती, बारामती ह.रा.भांबोरा) तसेच ऋषीकेश उर्फ बच्चन अनिल शिंदे ( रा. भांबोरा, ता. कर्जत) यांचा सहभाग असल्याचे समजले.
त्यानुसार यातील बिभिषण मत्रे याने सुनील शिंदे व प्रदीप हरिभक्त यांना सुपारी कोठे दिली. त्याचे ठिकाण दाखविले. यावेळी रोहन प्रदीप मोरे याच्याकडे सुपारीतील खर्च करून उरलेले २९ हजार रूपये त्याच्या घरातून जप्त केले आहेत. तसेच सुनील शिंदे याच्या घरातून ९० हजार रूपये, प्रदीप हरिभक्त याच्या घरातून ६० हजार रूपये, विशाल सवाणे याच्या घरातून ६३ हजार रूपये तर ऋषीकेश शिंदे याच्या घरातून ६६ हजार रूपये जप्त केले आहेत. या सर्वांनी खुन करताना अंगावर घातलेले कपडे व बूट अशा गोष्टी जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक विनोद घुगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य तपास करून तात्काळ संशयितांना मुद्देमालासह अटक केली आहे. त्यांना सुरूवातीला २० जुलैला तसेच २१ जुलैला पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंत २५ जुलैला आणखी सहा दिवसाची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.



