कुणबीची कागदपत्रे असणाऱ्या मुस्लिम पालकांनी ‘कुणबी’ नोंद दाखल्यावर करून घ्यावी – सकल मुस्लिम समाजाचे आवाहन

करमाळा (दि.२९) – ज्या मुस्लिम पालकांकडे “कुणबी”चे दाखले आहेत, अशांनी आपल्या पाल्यांच्या दाखल्यावर “कुणबी” नोंद करून घ्यावी असे आवाहन सकल मुस्लिम समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.


सकल मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष जमीर सय्यद अधिक माहिती देताना म्हणाले की, नुकतेच मराठा सेवा संघाच्या वतीने गटशिक्षण अधिकारी व नगरपालिका प्रशासन अधिकारी यांना निवेदने देण्यात आली. त्यात कुणबीची कागदपत्रे असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यावर “कुणबी” असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

सदर मागणी मान्य करत मराठा समाजातील विद्यार्थ्यांची नोंदी सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कुणबीच्या संदर्भात योग्य कागदपत्रे असणाऱ्यांनी मुस्लिम पालकांनी तात्काळ शाळा प्रशासनाशी संपर्क साधून आपापल्या पाल्याच्या दाखल्यावर “कुणबी” अशी नोंद करून घ्यावी. सामाजिक आणि शैक्षणिक सवलती मिळवण्यासाठी कुणबीची नोंद अत्यंत उपयुक्त ठरणार असून, पिढ्यानपिढ्या त्याचा फायदा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

“कुणबी” म्हणजे काय?
“कुणबी” हा शब्द मूळतः संस्कृत “कृषी” किंवा “कृषिक” या शब्दांशी संबंधित आहे. कुणबी हे पारंपरिक शेतकरी – म्हणजे जमीन कसणारे लोक होते. त्यामुळे “कुणबी” ही जात नसून सामाजिक-वर्ग किंवा पारंपरिक व्यवसायाची ओळख आहे.
महाराष्ट्रात बहुसंख्य कुणबी समाज हा मराठा जातीशी संबंधित मानला जातो. पण कुणबी हा सामाजिक वर्ग तेवढ्यावर मर्यादित नाही. मुस्लिम समाजातही कुणबी असू शकतात, विशेषतः जिथे इतिहास, दस्तऐवज किंवा सामाजिक व्यवहारातून त्यांची ओळख पटते. काही मुस्लिम कुटुंबांकडे आजही पूर्वजांचे कुणबी दाखले, जमीन नोंदी किंवा सरकारी दस्तऐवज आहेत, ज्यात कुणबी नोंद आहे.





