नृसिंह चिवटे यांचा नागरी सत्कार - आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन -

नृसिंह चिवटे यांचा नागरी सत्कार – आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
१. प्रतापराव जाधव, २. भरत गोगावले, ३. नृसिंह चिवटे

करमाळा(दि.१८): ज्येष्ठ पत्रकार नृसिंह मनोहर चिवटे यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले करमाळ्यात उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते उद्या दिवसभर करमाळ्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत करमाळा शहरातील श्री देवीचामाळ रोडवरील अमरनाथ टॉवर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा ते पाच आरोग्य शिबिर असून यामध्ये रुग्णांना मोफत तपासणी, मोफत औषधे, मोफत चष्मे वाटप, दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव वाटप करण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर करमाळा येथे उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.दुपारी चार वाजता भव्य नागरिक सत्कार होणार आहे. त्यानंतर रात्री सात ते दहा प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले,आमदार राजू खरे,आमदार नारायण पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार संजयमामा शिंदे  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, तसेच मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!