शेतकऱ्यांच्या मनातील खदखद व्यक्त करणारा 'नवरदेव बीएस्सी ॲग्री' २६ जानेवारीला होणार प्रदर्शित - Saptahik Sandesh

शेतकऱ्यांच्या मनातील खदखद व्यक्त करणारा ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ २६ जानेवारीला होणार प्रदर्शित

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता असलेल्या शेतकऱ्याला आजपर्यंत व्यावसायिक म्हणून खरी ओळख किंवा मान्यताच मिळालेली नाही. अनेक युवकांच्या मनातील ही खंत किंवा खदखद ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ या चित्रपटातुन व्यक्त होणार आहे.

करमाळा तालुक्यातील युवक राम खाटमोडे दिग्दर्शित ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ उद्या २६ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मागील काही वर्षांपासून फक्त शेती करणाऱ्या उपवर शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी त्यांना करावा लागणार संघर्ष नवरदेव बीएस्सी ॲग्री या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

या चित्रपटाची कथा देखील खाटमोडे यांनी लिहिली असून दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनसापुरे, प्रवीण तरडे, रमेश परदेशी, संदीप पाठक यांच्यासह क्षितीश दाते नायकाच्या तर प्रियदर्शनी इंदलकर नायिकेच्या भूमिकेत आहेत. याबरोबरच सैराट मधील तानाजी गळगुंडे आदी कलाकार असणार आहेत .या चित्रपटाचे निर्माते मिलिंद लडगे हे असून विनोद वणवे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

शेतीचे शिक्षण घेऊन त्यानंतर शेतीत काम करण्याची मानसिकता असलेल्या तरुणांना लग्न करताना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे या चित्रपटाच्या रंगतदार सादरीकरणातून दाखवण्यात आले आहे.

दिग्दर्शक राम खाटमोडे हे मूळचे करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथील असून त्यांचे वडील दत्तात्रय खाटमोडे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. राम खाटमोडे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (COEP) येथून इंजिनिअरिंग केली असून महाविद्यालयात असल्यापासूनच त्यांनी नाट्य स्पर्धामधून या क्षेत्रात काम सुरवात केली.  त्यांनी काम केलेले चित्रपट खाली दिले आहेत.

  • नवरदेव बीएस्सी ऍग्री – दिग्दर्शक
  • सरला एक कोटी – सहदिग्दर्शक
  • खिचिक – सहाय्यक दिग्दर्शक
  • मुळशी पॅटर्न – सहदिग्दर्शक
  • देउळबंद – सहाय्यक दिग्दर्शक
  • ‘सर्जा’ – पुस्तकाचे लेखक

ह्या चित्रपटाची कल्पना गेल्या ५ वर्षांपासून डोक्यात चालू होती. आता ती प्रत्यक्षात उतरत आहे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना समाजात सन्मान मिळत नाही, तो सन्मान कसा मिळवून देता येईल यासाठी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.

दिग्दर्शक राम खाटमोडे
दिग्दर्शक राम खाटमोडे
Teaser – Navaradev Bsc Agri

संपादनसुरज हिरडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!