नवभारत इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

करमाळा :करमाळा येथे ३० ऑगस्ट रोजी महात्मा गांधी विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत नवभारत इंग्लिश मेडियम स्कूलच्या तीन खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

या स्पर्धेत सिद्धी पृथ्वीराज देशमुख, दुर्वा दादासाहेब नवले व अंश दुर्गेश राठोड यांनी प्रभावी कामगिरी करत सर्वत्र प्रशंसा मिळवली. त्यांनी सलग सामने जिंकत तालुक्यातील विविध शाळांच्या खेळाडूंवर आपली श्रेष्ठता सिद्ध केली.

या यशात क्रीडा शिक्षक नागनाथ बोळगे यांचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षक देशमुख सर यांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. खेळाडूंमध्ये टीम भावना आणि आत्मविश्वास निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.

विद्यालयाचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, संचालिका सुनीता देवी, मुख्याध्यापिका अश्विनी देशमाने, तसेच शिक्षकवर्ग व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या विजयामुळे नवभारत इंग्लिश स्कूलचे नाव तालुक्यात गौरवाने झळकले असून विद्यार्थ्यांच्या यशाने शाळा परिवार व पालकवर्ग अभिमानाने भारावला आहे.


