सर्प दंश झालेल्या अडीच वर्षांच्या मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज

केम(संजय जाधव): अडीच वर्षांच्या राज रामचंद्र मोरे या मुलाला १५ मे रोजी घोणस या विषारी सापाने दंश केला असून त्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन मोरे परिवाराकडून करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे केम (ता. करमाळा) येथील व सध्या उरुळी देवाची जि. पुणे येथे वास्तव्यास असलेल्या रामचंद्र पांडुरंग मोरे यांचा अडीच वर्षांचा मुलगा राज, घराजवळ खेळत असताना राजने चेंबरमध्ये हात घातला आणि त्या क्षणी त्याला सर्पदंश झाला. त्यानंतर त्याला पुण्यातील नोबेल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मोरे कुटुंबीय अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करत असून, रामचंद्र मोरे पुण्यात एका ठेकेदाराकडे कंपनीत काम करत आहेत. मुलाच्या उपचारासाठी त्यांना मोठ्या आर्थिक मदतीची गरज असून त्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे.







