पांगरे गावात AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसाठी नवदिशा – शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -

पांगरे गावात AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसाठी नवदिशा – शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पांगरे (ता.करमाळा) या ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतीत नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीत, विशेषतः केळी व ऊसाच्या पिकांमध्ये कसा करावा, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


या कार्यक्रमाचे आयोजन पांगरे गावाचे उपसरपंच आणि यशस्वी व्यावसायिक महेश शिवाजी टेकाळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बारामती ऍग्रोचे अध्यक्ष आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी उपस्थित राहून उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करत केळी आणि ऊसाच्या पिकातील उत्पादन वाढवणे, पाण्याचे योग्य व्यवस्थापन
अशा विविध बाबींवर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना नव्याने विचार करण्याची दिशा दिली. AI तंत्रज्ञानामुळे शेती अधिक शास्त्रीय, मोजकी आणि फायद्याची होऊ शकते, हे त्यांच्या मार्गदर्शनातून समजले.


या कार्यक्रमाला पांगरेसह परिसरातील अनेक गावांमधून शेकडो शेतकरी मोठ्या उत्साहात उपस्थित राहिले. AI या नव्या विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांनी उत्सुकतेने सहभाग नोंदवला आणि अनेक प्रश्न विचारून आपले शंका समाधान करून घेतले. हा संवादात्मक भाग विशेष आकर्षण ठरला.
या उपक्रमास बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विवेक भोईटे तसेच बारामती एग्रोचे विकास अधिकारी प्रवीण भापकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. या तज्ज्ञांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक माहितीपूर्ण आणि प्रभावी झाला.


या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रदर्शन मा. बाळासाहेब गुटाळ यांनी केले. त्यांच्या ओघवत्या निवेदनशैलीमुळे संपूर्ण कार्यक्रम आकर्षक आणि संयोजित पद्धतीने पार पडला. या उपक्रमामुळे पांगरे गावाने आधुनिक शेतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन इतर गावांनाही AI तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती समृद्ध करण्याची दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!