मुस्लिम समाजाच्यावतीने मानाच्या गणपतींचे स्वागत करून भक्तांना प्रसाद केले वाटप
करमाळा (दि.१८) – करमाळा शहरात नेहमीच विविध सण-वारातून विशेषतः गणेशोत्सव, रमजान ईद मध्ये हिंदू-मुस्लिम समाजामध्ये ऐक्याची भावना असल्याचे दर्शन होत असते. यंदा मुस्लिम समाजाकडून सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
गणपती विसर्जनावेळी करमाळा येथील मानाचा पहिला गणपती असलेल्या श्री देवीचा माळ येथील राजे रावरंभा तरुण मंडळाची मिरवणूक सुभाष चौकात (श्रीराम चौकात) येताच मुस्लिम समाजाच्या वतीने श्री गणरायाचे व कार्यकर्त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. १६ सप्टेंबरला मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) सण असल्याने या निमित्ताने मुस्लिम समाजाकडून सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या महाप्रसाद वाटपावेळी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी, इंदाज वस्ताद अफरोज पठाण, सोहेल शेख तौफिक शेख, समीर दाऊद शेख, नवाज पठाण ,समीर सिकंदर शेख आदी मुस्लिम समाजातील युवकांनी तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व पोलीस उपनिरीक्षक माहुरकर व इतर पोलिस कर्मचारी,मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, नगरसेवक सचिन घोलप, सरकार मित्र मंडळाचे अध्यक्ष वांगडे, सामाजिक कार्यकर्ते विजय लावंड यांचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले.
गेल्या वर्षा पासून हिंदू आणि मुस्लिम समाजाचे दोन्ही सण एकाच वेळी येत असल्याने दोन्ही समाजाच्या मिरवणूकीत एकमेकांना अडथळा येऊ नये यामुळे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी स्वतः हुन पैगंबर जयंती गणेश उत्सवानंतर साजरी करण्याचा निर्णय घेतला व मुस्लिम समाजाने याला दुजोरा दिला. हिंदू मुस्लिम समाजात एकोपा राहील यासाठी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी नेहमीच प्रामाणिक पणे करत आले आहेत.