महाशिवरात्रीला श्री क्षेत्र संगोबा येथे लाखो शिवभक्तांची गर्दी; भक्तीमय वातावरणात यात्रा संपन्न

करमाळा: सीना व कान्होळा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र संगोबा येथे महाशिवरात्रीनिमित्त भक्तीचा अलोट सागर लोटला. रविवार व सोमवार अशा दोन दिवस चाललेल्या यात्रोत्सवात लाखो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. यंदाच्या पावसाळ्यात सलग तीन वेळा आलेल्या महापुरांमुळे चर्चेत राहिलेल्या या देवस्थानाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे करमाळ्याचे तहसीलदार ठोकडे यांच्या हस्ते, देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत विधीवत महापूजा संपन्न झाली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात ‘ॐ नमः शिवाय’ व ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
यात्रेनिमित्त झालेल्या प्रचंड गर्दीमुळे भाविकांना दर्शनासाठी चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागले. प्रशासन व ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, यात्रेदरम्यान निसर्गाचे विविध रंग अनुभवायला मिळाले—दिवसा कडक ऊन, रात्री हवेत गारवा आणि पहाटे कडाक्याची थंडी—अशा परिस्थितीतही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

प्रशासन व ग्रामपंचायतीचे नियोजन
पोथरे निलज ग्रामपंचायतीचे सरपंच अंकुश शिंदे, ग्रामसेवक बाळकृष्ण हजारे तसेच श्री आदिनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे सचिव प्रा. राजेश गायकवाड व सदस्य अनिल गायकवाड यांनी यात्रेचे नियोजन अत्यंत नेटके केले. भाविकांच्या सोयीसाठी वाहनांसाठी सुटसुटीत पार्किंग व्यवस्था, वरकुटे केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य पथकाची तैनाती, पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था व स्वच्छतेवर भर देण्यात आला. तसेच दिवसभर भाविकांसाठी फराळाचा प्रसाद वाटप करण्यात आला.

दिंडी-पालखीचे स्वागत; शांततेत यात्रा
विविध भागांतून आलेल्या दिंडी व पालखी सोहळ्यांचे मंदिर समितीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मंदिरात दर्शन घेतले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणतीही अनुचित घटना न घडता यात्रा शांततेत पार पडली.
यंदाच्या पावसाळ्यात संगोबा मंदिर परिसरात तीनदा आलेल्या महापुरांच्या पार्श्वभूमीवर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचे दिसून आले.
यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस निरीक्षक रणजित माने, उपनिरीक्षक गंगाराम उघडे, बिटचे हवालदार भराटे, नाईकनवरे, बिभीषण जाधव, महसूल विभागातील सर्कल अधिकारी ठाकर दादा, वळेकर, पोलीस पाटील चित्रा राऊत तसेच रवी जाधव, हनीफ शेख, सोमनाथ खराडे, सुनील जाधव, बबन भालेराव, शांतीलाल जाधव, संदीपान गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

