‘आषाढी’निमित्ताने जिल्ह्यात येणाऱ्या दिंड्याचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्यास कारवाई होणार..
करमाळा / प्रतिनिधी :
करमाळा : ‘आषाढी’ एकादशीच्या निमित्ताने आषाढीवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर, नाशिक, आदी भागातून विविध दिंड्या करमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात, २० जून ते ४ जुलै या कालावधीत पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर व आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी याबाबत अधिसूचना केल्या आहेत.
आषाढी वारी कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, संत श्री सोपानदेव महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानाच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातून व इतर प्रांतातून लाखो भाविक वारकरी येत असतात. २८ जून रोजी पंढरपूर येथे सर्व पालख्या एकत्र येतात. त्यावेळी पंढरपूर येथे वारकऱ्यांची संख्या १२ ते १४ लाख एवढी असते. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनेनुसार तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहेळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असते. तसेच वारकऱ्यांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरीसारखा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कालावधीत ड्रोन वापरणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.
तसेच पंढरपूर येथे लाखो भाविक मंदिर तसेच मंदिर परिसरात एकाच ठिकाणी एकवटलेले असतात. वेगवेगळ्या नदी घाटावर सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व पालखी मार्गावर बरेच टी.व्ही. चॅनेल्स, खासगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. मात्र, दहशतवादी कारवायांचा विचार करता पालखी सोहळ्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता जिल्ह्यात २० जून ते ४ जुलै या कालावधीत तसेच पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर व आषाढीवारीमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घालण्यात येत आहे.