आषाढी एकादशीनिमित्त कंदर येथे बाल दिंडी उत्साहात…
कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे :
कंदर (ता.करमाळा) येथील श्री शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर या स्कूलची प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षीही आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्याने आपली परंपरा व सांस्कृतिक वर्षाचे जतन करावे या उद्देशाने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आज मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पालखी सोहळ्याला प्रशालेच्या मैदानातून सुरुवात झाली. सर्वच विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषा करून दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.
यामध्ये मुलांनी पांढरा शर्ट पांढरी विजार कपाळावर टिळा डोक्यावर पांढरी टोपी तर मुलींनी साड्या घातल्या होत्या. आपल्या डोक्यावर तुळशी घेऊन सहभागी झाले होते.विठ्ठल रुक्मिणी वारकरी टाळकरी विणेकरी झेंडेकरी पखवाज वादक तसेच मुलींनी डोक्यावर तुळस घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम जय जय राम कृष्ण हरी विठोबा रुक्माई चा जयघोष करत पालखी सोहळ्याचा अनुभव घेतला. येथील मुख्य चौकात पांडुरंग मूर्ती समोर मुलींनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावर दिंडीचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळ्याला संस्थेचे संस्थापक सचिव सुनील भांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .तसेच मुख्याध्यापिका रेश्मा उबाळे व इतर शिक्षकांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.