कोंढारचिंचोली येथे दत्त जयंतीनिमित्त उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान व व्याख्यानाचे आयोजन.. -

कोंढारचिंचोली येथे दत्त जयंतीनिमित्त उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान व व्याख्यानाचे आयोजन..

0

चिखलठाण/ संदेश प्रतिनिधी :

चिखलठाण (ता.२८) : श्री दत्त जन्मोत्सव समिती कोंढारचिंचोली (ता.करमाळा) यांच्यावतीने दत्त जयंती निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान व जगणे खूप सुंदर आहे या विषयावर राहुल शिंदे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून बारामती ऍग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे उपस्थित होते. गेल्या दहा वर्षाची परंपरा असणाऱ्या कोंडाचिंचोली येथील दत्त जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात यावर्षी दत्तजन्मोत्सवानिमित्त व्याख्यान व कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमाबरोबरच करमाळा तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला होता.

यामध्ये उद्योग क्षेत्रात वैभव पोळ (शेटफळ)कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शेटफळ तालुका करमाळा येथील हर्षाली प्रशांत नाईकनवरे तर बाळासाहेब बोडखे यांना शैक्षणिक क्षेत्र नागनाथ लकडे अक्षय कोकरे श्रीनाथ गलांडे यांचा आपल्या क्षेत्रातील योगदानाबद्दल मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना गणेश करे- पाटील म्हणाले की करमाळा तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेल्या या उत्सवाची परंपरा इतर उत्सवांपेक्षा वेगळी असून समाज प्रबोधनाचे कार्य यानिमित्ताने होत असल्याने या कार्यक्रमांना विशेष महत्त्व आहे. बारामती ॲग्रो चे सुभाष गुळवे म्हणाले की कोंढार चिंचोली येथील संजय साळुंखे यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेले कार्य प्रेरणादायी असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान या निमित्ताने होत असल्याने हा कार्यक्रम इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

जगणे खूप सुंदर आहे या विषयावर बोलताना व्याख्याते राहुल शिंदे म्हणाले की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस हसायचं विसरून गेल्याने जगण्यातलं खरं समाधानच तो हरवून बसला आहे गौरवशाली परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र मध्ये चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या राजकारणामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. जाती- जाती समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम होत असल्याने समाजातील एकोपा कमी होत असून ही चिंतेची बाब आहे यासाठी वैचारिक स्वरूपाचे कार्यक्रम प्रत्येक गावात होणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुहास गलांडे यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार शेतकरी संघटनेचे निळकंठ शिंदे यांनी मानले या कार्यक्रमाला सरपंच शरद भोसले उपसरपंच श्रीराम गलांडे ,मराठा महासंघाचे पांडुरंग जगताप,मस्कर सर ,छगन वाळके, अशोक साळूंखे, सुभाष फलफले, सचिन जांबले, ज्ञानेश्वर गलांडे यांच्यासह या परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!