मकरसंक्रांतीनिमित्त महिलांचा वृक्षसंवर्धनाचा संकल्प; १०१ रोपांचे वाटप

0

करमाळा:निसर्गसंवर्धन व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर वृक्षसंवर्धनाचा आगळा उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष-सखी परिवाराच्या मुख्य प्रवर्तक माधुरी जयेश पवार यांनी सामाजिक कार्यकर्त्या शीतलताई गणेश करे-पाटील यांच्या उपस्थितीत फळझाडे, औषधी वनस्पती व शोभेची झाडे अशा एकूण १०१ रोपांचे महिलांना वाटप केले.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. मकर संक्रांती म्हणजे नव्या संकल्पांची सुरुवात या भावनेतून निसर्गाशी नाते अधिक घट्ट व्हावे, प्रत्येकाच्या अंगणात हिरवळ फुलावी व पुढील पिढीसाठी शुद्ध पर्यावरण जपले जावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

रोपांचे वर्षभर यशस्वी संगोपन करणाऱ्या महिलांचा पुढील वर्षी मकर संक्रांतीवेळी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती माधुरी जयेश पवार यांनी दिली. फळझाडांमुळे पोषणमूल्य वाढेल, औषधी वनस्पती आरोग्यास उपयुक्त ठरतील, तर शोभेची झाडे परिसराचे सौंदर्य वाढवतील, असा दुहेरी लाभ या उपक्रमातून साधला जाणार आहे.

या उपक्रमास पर्यावरणप्रेमी महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “माझे रोप – माझी जबाबदारी” हा संदेश देत प्रत्येक लाभार्थ्याने रोपांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.

या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या शीतलताई गणेश करे-पाटील, साहित्यिका अंजली श्रीवास्तव, वृक्षप्रेमी प्रियंका सागर गायकवाड, मोहोळकर अक्का शिंदे तसेच करमाळा येथील सा. ना. जगताप प्रशाला, मुली क्र. १ येथील सर्व शिक्षिकांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!