शिवजयंती निमित्ताने पोथरे येथे सामान्यज्ञान व शिवरायांच्या इतिहासावर असलेल्या परीक्षेत ९१ विद्यार्थ्यांची हजेरी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शिवजयंती उत्सव समिती पोथरेच्या वतीने सामान्यज्ञान व शिवरायांच्या इतिहासावर आधारित परीक्षेचे आयोजन आज (ता.१६) करण्यात आले होते, या परीक्षेसाठी इ ४थी ते ७वी चे ९१ विद्यार्थी उपस्थित होते. शिवजयंती उत्सव समिती पोथरे (ता.करमाळा) यांच्यावतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा पोथरे येथे शिवरायांचा इतिहास व सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेत १५० गुणांच्या व ७५ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न देण्यात आले होते.
यासाठी आयोजक व मान्यवरांद्वारे प्रथम क्रमांकाचे बक्षीस २१२१ रु., व्दितीय क्रमांकाचे बक्षीस १५१५ रु. ,तृतीय क्रमांकाचे ११११ रु., चौथ्या क्रमांकाचे ७७७ रु. तर पाचव्या क्रमांकासाठी ५५५ रु. चे बक्षीस जाहिर करण्यात आले आहे. या उपक्रमास पोथरे केंद्रशाळा व भागशाळा मधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमाची पूर्वसूचना आधीच मिळाल्यामुळे विद्यार्थी त्यादृष्टीने अभ्यासाच्या संपूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरले होते. शिवजयंती निमित्त असा प्रेरक उपक्रम विदयार्थ्यांसाठी राबविल्यामुळे शिवरायांचा इतिहास अधिकाधिक जाणून घेण्याची संधी विद्यार्थांना मिळाली व सामान्य ज्ञानावरील प्रश्नांमुळे त्यांच्या ज्ञानाला उजाळा देखील मिळाला.
डिजेवर थिरकणारी पावले अशा विविध प्रेरक उपक्रमांकडे अधिकाधिक वळाली तर उद्याच्या भावी पिढीवर आणि तरुणाईवर अधिकाधिक चांगले संस्कार होतील, असे मत विषयशिक्षिका श्रीम. हुंडेकरी यांनी व्यक्त केले. उपक्रमाचे आयोजक राज झिंजाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष साळुंके, सुनिल झिंजाडे, हरिचंद्र नंदरगे,पत्रकार नानासाहेब पठाडे, अविनाश झिंजाडे, निखिल देशमुख, दयानंद रोही, रमेश आमटे, सुदाम झिंजाडे यांचा शाळेच्यावतीने मुख्याध्यापक श्री.मस्तूद यांनी यथोचित सन्मान केला.
हा उपक्रम राबविल्याबद्दल इ. सहावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजकांना शुभेच्छापत्र देऊन त्यांचा आनंद व्यक्त केला. यासाठी उपशिक्षक बापू रोकडे सर, नितीन काळे सर, श्रीम शाबिरा मिर्झा, श्रीम.सविता शिरसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.