विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा - प्रा.गणेश करे-पाटील - Saptahik Sandesh

विजयादशमीनिमित्त सामाजिक बांधिलकी व गुणवत्तेचा सन्मान व्हावा – प्रा.गणेश करे-पाटील


करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : परशुराम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव याठिकाणी सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत गुणवत्तेचा सन्मान करत दसऱ्याचे औचित्य साधून प्रा.गणेश करे-पाटील संस्थापक अध्यक्ष यश कल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळा सक्षम व्हावी या हेतूने सहा टीव्ही संच भेट म्हणून देण्यात आले.

तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये बसविण्यात आलेल्या 10 सीसीटीव्ही कॅमेराचे देखील उद्घाटन या निमित्ताने रावगावचे विद्यमान सरपंच संदीप शेळके, उपसरपंच भाऊसाहेब करगळ, प्रमुख पाहुणे गणेश करे-पाटील, रावगाव ग्रामपंचायत चे आजी-माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री.करे-पाटील म्हणाले की, की पंडित जवारलाल नेहरू विद्यालय एक आदर्श विद्यालय आहे या ठिकाणी प्रत्येक वेळी आल्यानंतर काही तरी नाविन्यपूर्ण बाब बघायला मिळते. या विद्यालयातील विद्यार्थी ही गुणवंत, कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणारे व आपल्या यशाची चमक दाखवणारे आहेत. त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांचा त्यांच्या कार्याबद्दल गौरव करताना भविष्यात शाळेतील एखादा शिक्षक राष्ट्रपती पदक विजेता व्हावा, अशी भावना व्यक्त केली.

यावेळी आदर्श शाळा तसेच आदर्श कर्मचारी पुरस्कार मिळाल्याबद्दल रावगाव ग्रामस्थांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विद्यमान सरपंच संदीप शेळके बोलताना म्हणाले कि, या शाळेतील शिक्षकांचे कार्य समर्पण आणि विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आम्ही गावकरी प्रभावित झालो आहोत, शाळेतील शिक्षक आणि आमच्या गावकऱ्यांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण झाले असून शाळेच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वजण शिक्षकांच्या पाठीशी कायम राहू. शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने गौरविले याचा आम्हा गावकऱ्यांना खूप आनंद व अभिमान आहे.

यावेळी पवित्र पोर्टल द्वारे नवनियुक्त झालेल शिक्षक सुहास कानगुडे व पप्पु राठोड यांचा देखील सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दादासाहेब जाधव, विलास बरडे तसेच सर्वपक्षीय नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप बरडे यांनी केले, प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कोळेकर यांनी केले तर आभार किरण परदेशी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!