महिला दिनानिमित्त रणसिंग परिवाराकडून दहा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..

0


करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा, दि.२ : येत्या ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रणसिंग परिवारातर्फे भिगवण येथे दहा कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करून महिला सशक्तीकरणाचा अनोखा संदेश देण्याचा उपक्रम रणसिंग परिवाराने हाती घेतला आहे. रणसिंग परिवारातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी प्रशासन अधिकारी राजेंद्र रणसिंग यांची कन्या, समाजकल्याण अधिकारी नम्रता रणसिंग हिचा विवाह ८ मार्च रोजी भिगवण येथील व्यंकटेश लॉन्स येथे होत आहे. या मंगल प्रसंगाला सामाजिक बांधिलकीची जोड देत विवाहसोहळ्यातच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा स्तुत्य निर्णय या परिवाराने घेतला आहे. सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात स्मृतिचिन्ह, शाल व ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.


सन्मानित होणाऱ्या महिलांमध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा समावेश आहे. अलिबाग येथील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता माननीय डॉ. पूर्वा पाटील,उद्योजिका उषाताई आढाव (पोथरे), उमेद अंतर्गत कार्य करत अनेक महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या सारिका पवार (हिसरे), लग्नानंतर अपूर्ण शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून कार्यरत राहत बी.ए., बी.एड., एम.ए. व SETसह पीएच.डी. संपादन करणाऱ्या डाॅ. स्वातीताई जाधव , अल्पवयात आदर्श कीर्तनकार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या प्रगती रामराजे राजभोसले महाराज कोंढार-चिंचोली येथील डॉ. वैष्णवी गलांडे, पोलीस प्रशासनातील प्राजक्ता पाटील (खातगाव), केमिकल क्षेत्रात कार्यरत आरती गोरख मोरे (टाकळी), जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या माजी न्यायाधीश ॲड. संगीता यादव-देशमुख तसेच प्रतिकूल परिस्थितीत पतीसाठी स्वतःची किडनी दान करून त्यांना जीवदान देणाऱ्या सौ. रुपाली संजय साळवे (पोंधवडी) यांचा समावेश आहे. विवाहसोहळ्याच्या आनंदाला सामाजिक कर्तृत्वाची जोड देत महिलांच्या संघर्ष, जिद्द आणि यशाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून महिला शक्तीचा गौरव करावा, असे आवाहन रणसिंग परिवाराच्या वतीने राजेंद्र रणसिंग यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!