किर्तेश्वर देवस्थान पर्यटन केंद्र होण्याच्या मार्गावर

केत्तुर,( लक्ष्मीकांत पाटील याज कडून ): येथील भिमा नदीच्या तीरावर वसलेले हेमाडपंथी पांडवकालीन श्री किर्तेश्वर (महादेव) देवस्थान हे करमाळा तालुक्यासह इंदापूर, कर्जत, जामखेड, परंडा, फलटण, बारामती व दौंड तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाचा उल्लेख काशीखंड, शिवलीलामृत, योगवशिष्ठ या पुरातन ग्रंथांमध्ये आढळून येतो.
सन १९९५ मध्ये येथे भव्य तेरा कोटी नामजप यज्ञ पार पडला होता. या यज्ञास करवीर पीठाचे तत्कालीन शंकराचार्य विद्या शंकर भारती उपस्थित होते. तेरा दिवस चाललेल्या या यज्ञादरम्यान लाखो भाविकांना अन्नदान-ज्ञानदान करण्यात आले. तसेच मंदिराच्या कळसरोहनाचा सोहळाही काही वर्षांपूर्वी भव्यतेने झाला होता.
दर सोमवारी अन्नदान व नामस्मरण, मासिक शिवरात्रीस किर्तन-भजन, तर महाशिवरात्रीस अखंड हरिनाम सप्ताहासह शिवपूजेचा कार्यक्रम आयोजित केला जातो. श्रावण सोमवारच्या निमित्ताने किर्तनमहोत्सव, फराळ व अन्नदानाची परंपरा सालाबादप्रमाणे सुरूच असते. याशिवाय केत्तुर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरला आषाढी व कार्तिकी पायी पालखी सोहळाही आयोजित केला जातो.
मंदिराच्या भिंतीवरील कोरीव शिलालेख व विरगळांच्या आधारे हे मंदिर १२ व्या शतकातील असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाने या ठिकाणाची पाहणी करून नोंद केली आहे. मुघल आक्रमण काळात मंदिराची मोडतोड झाली होती. त्यानंतर भक्तांच्या योगदानातून जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे.
भिमा नदी या ठिकाणी अचानक दक्षिणवाहिनी होऊन पाण्यात मोठा भोवरा तयार होतो. त्यामुळे या स्थळाला चक्रतीर्थ असे म्हटले जाते. संत एकनाथ महाराजांच्या अभंगातही या स्थळाचा उल्लेख आहे. उजनी जलाशयाचे पाणी, घनदाट झाडी, विविध वनस्पती व पक्ष्यांमुळे येथे निसर्गरम्य वातावरण लाभले आहे.
भाविक व ग्रामस्थांनी शासनाकडे या देवस्थानाचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास आराखडात समावेश करून पायाभूत सोयीसुविधा द्याव्यात, अशी मागणी केली आहे. लवकरच या देवस्थानाचा समावेश शासनाच्या ‘वर्ग ब’ आराखड्यात होणार असून विकासकामांना सुरुवात होईल. तसेच
श्री किर्तेश्वर देवस्थान – धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गरम्य असे एकत्रित आकर्षण असलेले ठिकाण, भविष्यात पर्यटनकेंद्र म्हणूनही नावारूपाला येणार आहे.अशी माहिती श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टने दिली आहे.