कंदरजवळ दोन टेम्पो मध्ये अपघात – एकाचा मृत्यू

करमाळा : करमाळा-टेंभुर्णी रस्त्यावर कंदर गावाजवळ पांडुरंग पेट्रोल पंपाजवळ ५ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारास ११ वाजता झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

मृतकाच्या नातलगांनी या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, फूटजवळगाव (ता. माढा) येथील भाऊ तात्या सोनवणे (वय २५) हे आयशर कंपनीचा टॅम्पो (क्र. एमएच ५० एन ४९३५) चालवत होते. दरम्यान, कंदर गावचे बंडू चांगदेव लोकरे (रा. कंदर, ता. करमाळा) यांनी टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचा टॅम्पो (क्र. एमएच २५ एजे ४४८६) वेगात चालवून सोनवणे यांच्या टॅम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनवणे गंभीर जखमी झाले, तर लोकरे किरकोळ जखमी झाले.

अपघातानंतर सोनवणे यांना तातडीने उपचारासाठी मार्स हॉस्पिटल, टेंभुर्णी येथे दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.२० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात दोन्ही टॅम्पोंचे पुढील केबिन, काच, लाईट, इंजिन आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मृतकाच्या नातलगांनी या प्रकरणी बंडू चांगदेव लोकरे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



