बायपासवर भीषण अपघात – दोन भाऊ गंभीर जखमी- उपचार सुरु असताना एकाचे निधन

करमाळा(दि. 27) : करमाळा बायपासवरील सटवाई चौकाजवळ भीषण अपघातात बीटरगाव श्री येथील दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 26 ऑगस्ट) सकाळी घडली.

फिर्यादी बुवासाहेब बाबूराव गवळी (वय 39, रा. बीटरगाव श्री, ता. करमाळा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे चुलत पुतणे महेश गवळी व शुभम गवळी हे आपला आत्याचा मुलगा गणेश घायतड याच्या टीव्हीएस रायडर (क्र. एमएच 16 डीके 7572) वरून बीटरगाव(श्री) येथून करमाळ्याकडे येत होते.

दरम्यान, जगदंबा हॉटेल समोर त्यांच्या दुचाकीचा टायर पंचर झाल्याने ते मोटारसायकल बाजूला घेऊन थांबले असता, चॉकलेटी रंगाच्या आयशर कंपनीच्या टॅम्पोने (क्र. एमएच 21 बीएच 2446) थेट रस्त्याच्या खाली येवून धडक दिली. या धडकेत मोटारसायकल टॅम्पोच्या पुढील व मागील चाकांमध्ये अडकून दोघे गंभीर जखमी झाले.

या अपघातात महेश गवळी याच्या छातीला गंभीर मार लागून बरगड्या मोडल्या असून उजवा हात व उजव्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. तर शुभम गवळी याचा उजवा पाय पूर्णपणे मोडला आहे. दोघांनाही प्रथम करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लाईफलाईन हॉस्पिटल, अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.त्यातील महेश गवळी यांचे उपचार सुरु असताना 29 ऑगस्ट ला निधन झाले आहे.

अपघातानंतर टॅम्पो चालक वाहन जागेवर सोडून पसार झाला. पोलीसांनी टॅम्पो ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

