जेवण करताना अंगावरून टेम्पो गेल्याने एकाचा मृत्यू – कंदर येथील घटना

करमाळा(दि.२८): मित्राची केळी विक्रीसाठी कंदर येथील किरण डोके फुड्स कोल्ड स्टोअरेज येथे आणली होती. त्या मित्रा सोबत केळी घेऊन आला. टेम्पोचा नंबर येण्यास वेळ असल्याने चौघे जेवायला बसले. तिघांचे जेवण झाले आणि हा जेवत होता. ज्या टेम्पो समोर जेवत होता, त्याने खाली न पाहता अंगावर टेम्पो घातला आणि गंभीर जखमी झालेला मित्र जीवानिशी गेला. ही घटना कंदर येथे २० फेब्रुवारीला दुपारी चारच्या सुमारास घडली आहे.
यात आदित्य सदाशिव कपाळे (मु.पो. पार्डी, ता. किनवट, जि. नांदेड ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २० फेब्रुवारीला माझ्या टेम्पोतून आंध्रप्रदेशातून केळी घेऊन किरण डोके यांच्या कोल्ड स्टोअरेजवर दुपारी चारच्या सुमारास आलो होतो. त्यावेळी माझ्या सोबत माझा मित्र जयंत रविदास बांबोडे (वय २७, रा. शेणगाव, ता. जिवती, जि. चंद्रपूर) हा आला होता. कंदर येथे केळी खाली करण्यासाठी रांग लागली होती. त्यामुळे मी व माझा मित्र व अन्य दोघेजण असे आयशर टेम्पोसमोर जेवण्यास बसलो. साडेचार वाजता आम्हा तिघांची जेवणे होवून आम्ही उठलो तर जयंत बांबोडे हा तेथे जेवत होता. दरम्यान टेम्पोची रांग कमी झाल्याने मागील टेंम्पो चालकाने जयंत यास न पाहता सरळ टेम्पो सुरू केला व त्याच्या अंगावर घातला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले, परंतु उपचार चालू असताना डॉक्टांनी मयत झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी टेम्पोचालक सिध्देश्वर किसन वाळके (रा. भरकई, ता. टेंभी, जि. आदिलाबाद, तेलंगणा) याचे विरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.





