‘ओंकार लबडे’ची आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ हँडबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड..

करमाळा : करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील ओंकार ज्ञानदेव लबडे याने ऐतिहासिक यश मिळवत भारतीय हँडबॉल संघात स्थान मिळवले आहे. 16 ते 23 सप्टेंबरदरम्यान मालदीव येथे होत असलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ हँडबॉल स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत भारतासह मालदीव, बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या देशांचे संघ सहभागी झाले आहेत.

लबडे हा नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशनचा खेळाडू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघात निवड होणारा करमाळा तालुक्यातील पहिला हँडबॉलपटू ठरला आहे. त्याची निवड हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसचिव रुपेश दादा मोरे व हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्रचे महासचिव प्रा. राजाराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तसेच स्थानिक पातळीवर नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशनचे सचिव विनोद गरड यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.


ओंकारने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर मिरजगाव (ता. कर्जत) येथील शेतकी महाविद्यालयातून कृषी पदवी घेतली आणि सध्या तो पुण्यात एम.बी.ए.चे शिक्षण घेत आहे. शालेय जीवनातच त्याला हँडबॉल खेळाची आवड निर्माण झाली आणि त्याने सातत्याने सराव करून आज हे यश मिळवले आहे.

त्याच्या या निवडीबद्दल आमदार नारायण आबा पाटील, पंचायत समिती सभापती अतुल भाऊ पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक यांनी अभिनंदन केले आहे. तसेच नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन जेऊरचे अध्यक्ष संतोष नुस्ते, दत्तात्रय वाघमोडे, विनोद गरड यांनीही आनंद व्यक्त केला आहे.


 
                       
                      