उच्च न्यायालय व खंडपिठातील प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची संधी
करमाळा (दि.१६ ) – मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद व नागपुर खंडपीठातील खटला करमाळा येथुन आभासी पध्दतीने विशेष लोकअदालतीत तडजोडीने मिटविण्याची संधी तालुका विधी सेवा समिती, करमाळा यांनी उपलब्ध केली आहे.
उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठ येथे ३० नोव्हेंबर २०२४ व १ डिसेंबर २०२४ रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोकअदालतमध्ये मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद व नागपूर खंडपीठ येथे प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत.
करमाळा तालुक्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे या ठिकाणी प्रलंबित आहेत व ती तडजोडीने मिटावित अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येउ शकतात. या विशेष लोकअदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष व आभासी पध्दतीने सहभागी होउ शकतात. करमाळा तालुक्यातील प्रकरणे उच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदातीमध्ये ठेवण्यासाठी पक्षकारांनी संबंधित वकिलांना कल्पना दयावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर किंवा तालुका विधी सेवा समिती, करमाळा यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, करमाळा मा. सौ. एम.पी. एखे यांनी केले आहे.