कुकडी-उजनी उपसा सिंचन योजनेसाठी शासनाकडून कृष्णा खोरे विकास महामंडळाला निधी वितरण करण्याचा आदेश - Saptahik Sandesh

कुकडी-उजनी उपसा सिंचन योजनेसाठी शासनाकडून कृष्णा खोरे विकास महामंडळाला निधी वितरण करण्याचा आदेश

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी योजनेच्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन / बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध होणे संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी केली होती. सदर मागणीला अनुसरून महाराष्ट्र शासनाकडून कृष्णा खोरे विकास महामंडळाला निधी वितरण करण्याचा आदेश क्र. व्हीआयपी-२०२४/प्र.क्र १२१/२४)/जसंअ दि. २५.०७.२०२४ नुसार काढण्यात आल्यामुळे आता सदर योजनेच्या टेंडरची प्रक्रिया मार्गी लागणार आहे.

आ.संजयमामा शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्येच कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केलेली होती, परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे तो विषय प्रलंबित होता. विद्यमान महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आ. शिंदे यांनी 1 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची मागणी केली .त्यानुसार शासनाकडून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला सर्वेक्षणासाठी निधी मंजुरीचे आदेश देण्यात आले आहेत.

आमदार संजयमामा शिंदे यांच्या संकल्पनेनुसार प्रस्तावित केलेली कुकडी उजनी उपसा सिंचन योजना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दोन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केलेली आहे.

टप्पा 1 –
रिटेवाडी येथून पाणी उचलून ते मोरवड येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉल मध्ये टाकले जाईल. हे अंतर 20.13 किमी आहे त्यासाठी 18 00 मी मी व्यासाच्या 2 समांतर पाईपलाईन व 32 34 अश्वशक्ती क्षमतेचे 8 विद्युत पंप सुचविलेले आहेत. या पहिल्या टप्प्यातील योजनेमधून 18472 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.


टप्पा 2 –
या टप्प्यात केतुर येथून पाणी उचलून ते सावडी येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉलमध्ये टाकले जाईल. हे अंतर 17.60 किलोमीटर असून त्यासाठी 1800 मी मी व्यासाची 1 पाईपलाईन सुचविलेली आहे. सदर पाणी उचलण्यासाठी 3100 अश्‍वशक्तीचे 4 विद्युत पंप सुचविलेले आहेत .सदर टप्प्यावरून 5790 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!