केममध्ये दत्त जयंती उत्साहात; विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

केम(संजय जाधव) :केम परिसरातील विविध ठिकाणी दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. देवकर वस्तीवरील दत्त मंदिरात रोषणाई करण्यात आली होती. सकाळी दत्त भक्त बलभीम तुकाराम बिचितकर यांच्या हस्ते अभिषेक पार पडला. त्यानंतर सकाळी ११ ते १ या वेळेत ह.भ.प. शेळके महाराज (ऊपळवाटे) यांचे कीर्तन झाले. दत्तजन्म झाल्यानंतर मंदिरात पुष्पवृष्टी करण्यात आली. पुढे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिर येथेही दत्त जयंतीनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. ही सजावट भैया मोकाशी व तात्या गुरव यांनी केली. मंदिरात श्रींचा अभिषेक संपन्न झाला. सायंकाळी ४ ते ६ दरम्यान ह.भ.प. शिंदे महाराज (पाथूर्डी) यांचे कीर्तन झाले. सहा वाजता मंदिरात पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज उपस्थित होते. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.

निमोणी वस्तीवरील ह.भ.प. मच्छिंद्र गुरुजी यांच्या निवासस्थानी दत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दत्तजन्माचे कीर्तन ह.भ.प. मिस्किल महाराज दहिवली यांनी सकाळी १० ते १२.३० या वेळेत केले. दत्तजन्मानंतर मंदिरात पुष्पवृष्टी झाली. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

या सर्व कार्यक्रमांसाठी बलभीम तुकाराम बिचितकर, ह.भ.प. मच्छिंद्र गुरुजी, देवकर वस्तीवरील दत्त भक्त तसेच ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.


