करमाळ्यात ६ जानेवारीला “सुर-सुधा” संगीत महोत्सवाचे आयोजन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने 6जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता गुरुप्रसाद मंगल कार्यालय, दत्तपेठ येथे सुर सुधा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते तर प्रमुख उपस्थिती म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सहसंचालक दत्तात्रेय देवळे उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवामध्ये सूरताल संगीत विद्यालयाचे विद्यार्थी आपली विविध कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर विविध राज्यातून आलेले कलाकार आपले गायन व नृत्य सादरीकरण करतील. संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच आलेल्या कलाकारांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील व नांदेड येथे पोलीस इन्स्पेक्टर नागनाथ आयलाने यांना बा. सं. नरारे महाराज जीवन गौरव पुरस्कार तर डॉ. कविता कांबळे यांना करमाळा संगीत रसिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कलाकारामध्ये सरबानी सेन कोलकत्ता व चित्रलेखा गोगोई गुवाहाटी यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, डॉ. विधी नागर इंदौर व डॉ. मयुरा आनंद खटावकर मुंबई यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, स्नेहा रामचंद्र हैदराबाद व अर्पिता व्यंकटेश कोलकता यांना नृत्य शिरोमणी अवार्ड, काकली हजारिका गुवाहाटी व बनिता भांजा भुवनेश्वर यांना नृत्यसम्राज्ञी अवार्ड तर दीपिका बोरो गुवाहाटी यांना करमाळा नृत्य कला अवार्ड देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा आणि विद्या विकास मंडळ करमाळा या संस्थेचे सहकार्य लाभणार असून या महोत्सवासाठी रसिक व श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.