पोथरे येथे दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदिप दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा(दि.१९):पोथरे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘स्वरदिप दिवाळी पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भावगीत, भक्तिगीत आणि चित्रपट गीतांच्या स्वरांनी सजणारी ही संगीतमय पहाट संदिप पाटील यांच्या प्रस्तुतीत, महाराष्ट्रातील नामांकित वादकांच्या साथीने रंगणार आहे.

बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता शनि मंदिर परिसरात ऐतिहासिक २१२१ दिव्यांच्या दीपोत्सव सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, परिसरात प्रकाशोत्सवाचे दिमाखदार दर्शन घडणार आहे. महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष मनोरंजनात्मक उपक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, तसेच भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बलदोटा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

वादन, गायन आणि निवेदन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभणार असल्याने पोथरे व पंचक्रोशीतील रसिकांसाठी ही संगीतमयी मेजवानी ठरणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून या पर्वणीची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त पोथरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.



