भारतीय सेनेच्या सन्मानार्थ करमाळ्यात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली

करमाळा (दि.२२)– जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला होता. या घटनेनंतर भारतीय लष्कराने केंद्र सरकारच्या आदेशाने पाकिस्तानला करारा प्रत्युत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे हल्ल्याचा बदला घेतला. या लष्करी कारवाईतील शौर्य, संयम व बलिदानाच्या सन्मानार्थ करमाळा शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.


रॅलीची सुरुवात श्री खोलेश्वर मंदिर (किल्ला विभाग) येथून झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गावर करमाळा शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत केले.

या रॅलीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. श्रीराम परदेशी, भाजप नेत्या रश्मी बागल, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शिवसेनेचे दिग्विजय बागल, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, करमाळा मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे, ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन पिसाळ, माजी सैनिक हंसराज पाटील, तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने जागतिक स्तरावर आपल्या लष्करी ताकदीचे व दहशतवादविरोधी कठोर धोरणाचे प्रदर्शन केले. देशाच्या सुरक्षेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ आयोजित ही रॅली करमाळ्यातील जनतेच्या राष्ट्रप्रेमाचे प्रतीक ठरली.




