१ वर्ष जुने ताक पिल्याने एसटी प्रवाशाला झाला त्रास – अधिकृत थांब्याच्या हॉटेलवरील प्रकार

करमाळा(दि.१६) : हॉटेलमधील विक्रेत्याने एक वर्ष जुन्या ताकाच्या बॉटल ग्राहकाला प्यायला दिल्यामुळे ग्राहकाला प्रवासात तीन वेळा उलट्या झाल्या. हा प्रकार पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटी महामंडळाचा अधिकृत थांबा असलेल्या हॉटेलमध्ये घडला आहे. यावेळी सदर प्रवाशाने याबाबतचा व्हिडीओ देखील तयार केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे हे पुण्यावरून करमाळ्याला येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करत होते. नेहमीप्रमाणे एसटी पुणे-सोलापूर हायवेवर भिगवन जवळील खडकीमधील हॉटेल साईसागर गार्डन अँड रेस्टॉरंट येथे जेवण-नाश्त्यासाठी थांबली. यावेळी श्री ननवरे यांनी ३० रुपये किंमतीच्या दोन ताकाच्या बॉटल विकत घेतल्या. त्यातील एक बॉटल त्यांनी उघडून ताक पिले. थोडे ताक पिल्यानंतर त्यांना त्याची वेगळीच चव लागली. मग त्यानंतर त्यांनी त्या बॉटलवर लावलेला बॅज चेक केला तेव्हा त्यांना लक्षात आले की त्या बॉटलची मुदत संपून एक वर्ष झाले होते.

ही गोष्ट त्यांनी हॉटेल मालकाच्या लक्षात आणून दिली त्यावेळी हॉटेल मालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. श्री ननवरे यांनी याबत पुढे तक्रारीसाठी सदर बॉटलचे बिल मागितले. यावर मालकाने बराच वेळ खाण्याचा प्रकार केला. शेवटी अनेक विनवण्या केल्यानंतर त्यांना कसेबसे कच्चे बिल हॉटेल मालकांकडून देण्यात आले. शेवटी एसटीतील प्रवाशांना निघायचे असल्यामुळे त्यांनी सदर हॉटेल मालकासोबत एक व्हिडिओ तयार केला (हा व्हिडीओ बातमीत खाली दिला आहे) व ते एसटीमध्ये पुढच्या प्रवासाला निघाले. वाटेत त्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी सदर ताकामुळे मळमळ होऊन उलटी झाली. श्री ननवरे यांना कधीही एसटीच्या प्रवासामध्ये मळमळ हा प्रकार होत नसतो परंतु या उलट्या ज्या झाल्या त्या ताकामुळे झाल्या होत्या याची त्यांना खात्री झाली. जर त्यांनी ताक विकत घेण्यावेळी त्या बॉटल वरील मुदत व्यवस्थित पाहिली असती तर हा प्रसंग ओढावला नसता.
विक्रेत्याकडून मुदत संपलेली वस्तू विक्रीस ठेवणे चुकीचे आहे. ताकासारखी गोष्ट पंधरा दिवसाची मुदत असताना एक वर्ष जुनी बॉटल विक्रीस ठेवली आहे. फक्त पैसे कमविणे याच्या पलिकडे काही विक्रेत्यांना काहीही घेणेदेणे नसते. यामागे अन्न आणि प्रशासन विभागाने अशा वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर धाड घालून कारवाई करावी. तसेच ग्राहकांनी देखील खरेदी वेळी एक्सपायरी डेट बघूनच वस्तू खरेदी करावी जेणेकरून आपल्या जीवाशी खेळ होऊ नये.
● गहिनीनाथ ननवरे, सभापती, करमाळा पंचायत समिती

हॉटेल विरोधात प्रवाशांच्या तीव्र प्रतिक्रिया!
यासंदर्भात विविध प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता पुढील प्रतिक्रिया मिळाल्या
- एसटीचा अधिकृत थांबा असल्यामुळे नाविलाजाने इथे प्रवाशांना खावे लागते. वास्तविक या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ बनवताना व सर्व्हीस देताना कोणतेही हायजिन पाळले जात नाहीत. चांगली चव नसते.
- हॉटेल मालक व इतर आलेल्या प्रवाशांशी नेहमीच उद्धटपणे बोलतात
- या हॉटेलमध्ये कॅशमध्येच पैसे घेतले जातात, ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही.
- महामंडळाने जर अधिकृत थांबा दिला असेल तर बाथरूमची सोय चांगली करणे अपेक्षित असताना अस्वच्छ व अर्धे उघडे असे बाथरूम वापरास दिले जाते.
- इथे जे खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल आहे तिथे वस्तू बाहेर बाजाराभावा पेक्षा महाग विकले जाते.
- तसेच इथे अनेक वस्तू या ओरिजनल कंपनीसारखे दिसणारे डुप्लिकेट कंपनीने बनवलेले विक्रीस ठेवले जाते. ओरिजिनल पेक्षाही महाग किमतीत विक्रीस ठेवले जातात.
- अनेक वेळा मुदत संपत आलेले किंवा संपलेले प्रोडक्ट विकले जातात.
- एसटीतील सामान्य प्रवाशांना परवडत नसलेले हॉटेल, थांबा म्हणून देण्यामागे काय कारण आहे?
- गेले अनेक वर्षे झाले एकच हॉटेल थांबा म्हणून दिले आहे. एसटी महामंडळ मधील अधिकारी व हॉटेल मालक यांच्यात काय साटेलोटे आहे? हे पाहणे गरजेचे आहे.




