एसटी बस बंद पडण्याचे सत्र सुरूच – केडगाव-चौफुला येथे प्रवाशांना ढकलावी लागली बस

करमाळा(दि.२६): करमाळा आगारातील विविध बस प्रवासादरम्यान बंद पडण्याचे सत्र सुरूच आहे. काल (दि.२५) पुणे-सोलापूर महामार्गावर केडगाव-चौफुला येथे करमाळा आगाराची बस बंद पडली होती. शेवटी एसटी मधील प्रवाशांनी ही बस ढकलून सुरू केली.
या बंद पडणाऱ्या बसमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बस मध्ये अनेक अधिकारी, महिला, जेष्ठ नागरिक यांची संख्या मोठी असते. बहुतेकांना अर्जंट जायचे असते. मात्र बस बंद पडल्याने प्रवाशासह चालक व वाहकाची अडचण होते. अशावेळी त्याच मार्गाने जाणारी एखादी बस आली तर बंद पडलेल्या बसचा वाहक त्या बसमध्ये प्रवासी बसून पाठविण्याचा प्रयत्न करतो ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत वेळ वाया जातो शिवाय ज्या बसमध्ये प्रवासी पाठवायचे आहेत त्या बसमध्ये जागा असली तर तो वाहक प्रवासी घेतो, अन्यथा दुसऱ्या बसची वाट पहावी लागते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया तर जातोच पण पुढे केलेले सर्व नियोजन कोलमडते त्यामुळे बस बाहेर जातानाच ती सुस्थितीत आहे का याची खात्री करून एसटी आगारातील संबंधितांकडून खात्री करून ती बाहेर पाठविली पाहिजे असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.





