१२ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चा

करमाळा:जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध विभागांतील लाखो कर्मचारी १२ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विधानभवनावर ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चा’ काढणार आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान होणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरात मोठी तयारी सुरू असून कर्मचारी संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्वांसाठी १९८२ च्या निवृत्ती वेतन नियमांनुसार जीपीएफसह जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. शासनाने प्रस्तावित केलेली GPS योजना तसेच विद्यमान DCPS/NPS योजना कर्मचारी संघटनांनी अस्थिर आणि असुरक्षित म्हणून नाकारल्या आहेत.

या मोर्चाची सुरुवात नागपूर मधील यशवंत स्टेडियम येथून होऊन विधानभवनावर मोर्चाचा शेवट होणार आहे. राज्यभरातून कर्मचारी मोठ्या संख्येने नागपूरकडे रवाना होत असल्याने मोर्चाला व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना सर्वांनी मोठ्या संख्येने नागपूर येथे हजर रहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हानेते तात्यासाहेब जाधव यांनी केले आहे.

