उत्तरेश्वर कॉलेजमध्ये पावसावरील काव्यगायन कार्यक्रम उत्साहात संपन्न -

उत्तरेश्वर कॉलेजमध्ये पावसावरील काव्यगायन कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

केम(संजय जाधव): –  श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम या ठिकाणी पावसाच्या कविता भित्तिपत्रिका उद्घाटन व काव्य गायन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री सौ.सोनल गौरव कुलकर्णी  तर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री माधव बेले हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम मधील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पावसाच्या कविता या सुरेख व सुंदर अशा भितीपत्रिकेचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सौ सोनल कुलकर्णी यांनी ग्रामीण भागात असणाऱ्या श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मधील या भित्तिपत्रिकेचे कौतुक केले. शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधा या कॉलेजमध्ये मिळत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्या मनोगतात त्यांनी कविता म्हणजे मानवी मनाचे , भावभावनांचे उत्स्फूर्तपणे झालेले प्रकटीकरण असल्याचे सांगितले. या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिते व्हा असा संदेश दिला.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य श्री माधव बेले यांनी पाऊस , श्रावण महिना आणि कविता यांचे अतूट नातेसंबंध विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले. श्रावण सरी मधील पावसाच्या कवितांचे सादरीकरण विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासास निश्चितच बळ देते असे त्यांनी सांगितले.

यावेळी  कु. प्राजक्ता पाटील व कु.तेजस्वी कांबळे, कु.नंदिनी देवकर, कु.प्रांजल कोळी, कु.धनश्री शिंदे, कु.सानिका पळसकर, कु. अनिता माने, कु.गायत्री ओहोळ या विद्यार्थिनींनी पाऊस या विषयावरील कवितांचे सादरीकरण केले.

      या कार्यक्रमास प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!