करमाळ्यात आज विषमुक्त भाजीपाला बाजारचे आयोजन

करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आज (रविवार, दि. ५ ऑक्टोबर) विषमुक्त भाजीपाला बाजार भरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे राज्य समन्वयक सत्यवान देशमुख व करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विषमुक्त भाजीपाला खरेदीसाठी करमाळा तालुका व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाणी फाउंडेशन टीम करमाळा चे प्रतीक गुरव व आशिष लाड यांनी केले आहे.

सध्याच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या धकाधकीच्या युगात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक आजार वाढीस लागले आहेत. हृदयविकार, मधुमेह, कर्करोग यामध्ये भर पडत आहे. यामागचे मुख्य कारण रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यावर उपाय म्हणून विषमुक्त अन्न व भाजीपाला ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची संकल्पना पाणी फाउंडेशनने पुढे आणली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून करमाळा टीमने विषमुक्त भाजीपाला पिकविणारे शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळावा घेऊन जागृती केली होती. त्यानंतर ‘सत्यमेव जयते वॉटर कप’, ‘समृद्ध गाव स्पर्धा’, ‘फार्मर कप स्पर्धा’ आदी उपक्रमांतून तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

या बाजारात महेंद्र देशमुख, अतुल राऊत, सोमनाथ सायकर, विजय अवताडे, गोपीनाथ रोकडे, सुनील दौंडे, हिराजी राऊत, धनाजी माने, जीवन होगले, विक्रम खरात व प्रताप जाधव या शेतकऱ्यांचे विषमुक्त भाजीपाल्याचे स्टॉल असणार आहेत.



 
                       
                      