बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, वाहन जप्त

करमाळा(संदेश प्रतिनिधी): उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत सुमारे ७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल(वाळू व वाहन) जप्त केले आहे.

दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पो.कॉ. अनिल निकम, पोहेकॉ. खुटाळे व पो.कॉ. पवार यांनी टेंभुर्णी-जेऊर रस्त्यावर आदिनाथ कारखाना जवळ वाहनाला अडवले. त्यावेळी MH-45/AF-6531 क्रमांकाचा अशोक लेलँड वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू (किंमत ७ हजार रुपये) आढळली.

वाहन चालकाने आपले नाव बालाजी महिपती जाधव (रा. निरा नरसिंहपूर, ता. इंदापूर, जि. पुणे) असे सांगितले. तर त्याच्या शेजारी बसलेल्या इसमाचे नाव हशम शाहिद शेख (रा. इंदिरानगर, जेऊर, ता. करमाळा) असे आहे. वाहनाचे मालक विकास मस्के (रा. शेवरे, ता. माढा) असल्याची माहिती चालकाने दिली. वाहनावरील वाळू ही भीमा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या घेतली असल्याचे समोर आले असून कोणताही परवाना वा रॉयल्टी पावती चालकाकडे नव्हती. पोलिसांनी वाहन व वाळू जप्त करून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



