उजनी जलाशयातील मोटारींची चोरी – शेतकऱ्यांनी पकडलेल्या संशयितास पोलीसांनी सोडले
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उजनी जलाशयावर टाकलेल्या मोटारींची चोरी झाली असून, यात संबंधित शेतकऱ्यांनी संशयितास मोटारीसह रंगेहाथ पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. असे असलेतरी पोलीसांनी मोटार ताब्यात घेऊन संशयितास सोडून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
उमरड येथील अतुल मारूती कोठावळे यांनी ७ ऑगस्टला करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २५ एप्रिल २०२१ ला शिवाजीराव सरडे यांच्या दुकानातून मोनोब्लॉक कंपनीची मोटार ४७ हजार ५०० रू. ची विकत घेतली होती. ती उजनी जलाशयात टाकली होती. ६ ऑगस्टला सकाळी मोटार चालू करण्यास गेलो असता ती मोटार चोरीला गेल्याचे समजले.
या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान संबंधित फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांनी या मोटारीचा शोध घेणे सुरू केले. त्यावेळी जेऊर येथील एका रिवायडींगच्या दुकानात सदरची मोटार दिसून आली. त्यावेळी शेतकऱ्यांनी संबंधित रिवायडींग वाल्यास ही मोटार कोणाची आहे.. असे विचारले असता त्यांनी पोंधवडीच्या संशयिताचे नाव सांगितले. शेतकऱ्यांनी त्यास संबंधित संशयितास बोलावून घेण्याची विनंती केली.
त्यानुसार संशयित हा जेऊर येथे आला व त्याने या मोटारची किंमत ३५ हजार रूपयात विक्री करण्याचे सांगितले. त्यावेळी शेतकऱ्यांनी ही मोटार आमची असून तुम्ही चोरली आहे. असे म्हणून संबंधितास मोटारीसह पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलीसांनी मोटार ताब्यात ठेवली व रात्रीच संशयितास सोडून दिले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून विद्युत पंपाची चोरी करणारे चोर सापडत नाहीत आणि महत प्रयासाने मुद्देमालासह सापडलेला चोर पोलीसांनी का सोडला ? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.